डिचोलीत दोन तलाठी कोरोनाबाधित; मामलेदार कार्यालयात खळबळ, रुग्णसंख्या वाढली

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

तलाठी कोरोनाबाधित आढळून येताच लागलीच मामलेदार प्रवीणजय पंडित यांच्या निर्देशानुसार कार्यालयात सॅनिटायझेशन करण्यात आले.

डिचोली: कोरोना महामारीच्या संसर्गाने तालुक्‍यातील काही भागात शिरकाव केल्याने रुग्ण वाढत असतानाच, मामलेदार कार्यालयाशी संबंधित दोन तलाठी पॉझिटिव्ह आढळून आल्याने डिचोलीत खळबळ माजली आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तलाठ्यांचा मामलेदार कार्यालयात संपर्क आल्याने इमारत संकुलातील अन्य सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. तलाठी कोरोनाबाधित आढळून येताच लागलीच मामलेदार प्रवीणजय पंडित यांच्या निर्देशानुसार कार्यालयात सॅनिटायझेशन करण्यात आले.

 

डिचोली मामलेदार कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची स्वॅब चाचणीही करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेला एक तलाठी मये मतदारसंघातील, तर दुसरा तलाठी साखळी मतदारसंघातील पंचायतीशी संबंधीत असल्याची माहिती मिळाली आहे.

 

मये, साखळीत रुग्ण वाढताहेत

डिचोली तालुक्‍यात आज आणखी २६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून मये आणि साखळी परिसरात रुग्ण वाढत असल्याचे आढळून येत आहे. मये-वायंगिणी पंचायत क्षेत्रातील हातुर्ली, भावकई, जांभुळभाट आणि वरपाल येथे मिळून ८, पिळगाव येथे एक मिळून मये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात १० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.. साखळीतील विर्डी भागात नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी मये विभागात ६०, डिचोली विभागात २६ आणि साखळी विभागात ८६ मिळून १७२ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या