कारापूर-सर्वण पंचायतीच्या सरपंचपदी उज्वला कवळेकर

Tukaram Sawant
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

डिचोली तालुक्‍यातील कारापूर-सर्वण पंचायतीच्या सरपंचपदाची माळ अखेर अपेक्षेप्रमाणे उज्वला कवळेकर यांच्या गळ्यात पडली आहे. रिक्‍त सरपंचपदासाठी शुक्रवारी (ता. १४) घेण्यात आलेल्या निवडणुकीत सौ. कवळेकर यांची बिनविरोध निवड झाली.

डिचोली
मागील महिन्यात सुषमा सावंत यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्‍त झाले होते. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी पंचायत कार्यालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीस पंचायतीच्या अकरापैकी उपसरपंच दामोदर गुरव यांच्यासह मावळत्या सरपंच सुषमा सावंत, उज्वला कवळेकर, रमेश सावंत, लक्ष्मण गुरव, योगेश पेडणेकर, रेश्‍मी नाईक, नीता मोरजकर आणि रसुल मदार हे पंच सदस्य उपस्थित होते, तर महेश सावंत आणि दत्तप्रसाद खारकांडे हे दोघेजण अनुपस्थित होते. सरपंचपदासाठी सौ. कवळेकर यांनी सादर केलेल्या अर्जावर सुचक आणि अनुमोदक म्हणून अनुक्रमे सुषमा सावंत आणि दामोदर गुरव यांनी सही केली. निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित असलेल्या डिचोली गट विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी नवनाथ आमरे यांनी सौ. कवळेकर यांचा अर्जं ग्राह्य धरुन त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी पंचायत सचिव सुजाता मोरजकर यांनी सहकार्य केले. आमदार प्रवीण झांट्ये यांच्या सहकार्याने सहकारी पंच सदस्यांना विश्वासात घेवून पंचायतीच्या विकासाला आपण प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच उज्वला कवळेकर यांनी सांगितले.

संपादन - यशवंत पाटील

 

संबंधित बातम्या