मयेतील तिळारी कालव्याबाबत अनिश्‍चितता

Tukaram Sawant
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

जोपर्यंत कालव्याविषयी स्पष्ट आराखडा आणि भू-संपादनाविषयी निश्‍चित माहिती स्पष्ट होत नाही, तोपर्यंत मये येथील जोड कालव्याचा प्रस्तावावर विचार करू नये, अशी मागणी मये पंचायतीसह शेतकऱ्यांनी केली आहे. तर भटवाडी परिसरातून कालवा नको, अशी मागणी तेथील शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे मये येथील गोयंगणे तळ्यापर्यंतच्या प्रस्तावित कालव्याचे भवितव्य अधांतरी बनले आहे.

डिचोली
मये गावातील शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी नार्वेपर्यंत पोचलेल्या तिळारी कालव्याचा मये तलावापर्यंत विस्तार करून पुढे हा कालवा भटवाडी येथून हळदणवाडी-मये येथील गोयंगणे तळ्यापर्यंत नेण्याचा जलसंपदा खात्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावासंबंधी शेतकऱ्यांना माहिती देवून त्यांची मते जाणून घेण्यासाठी जलसंपदा खात्यातर्फे गुरुवारी (ता. १३) मये पंचायत सभागृहात शेतकऱ्यांसाठी बैठकीचे आयोजन केले होते. भटवाडी येथील नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर २०१३ साली कालव्याचा प्रस्ताव मागे पडला होता. आता हा प्रस्ताव नव्याने पुढे आला आहे. भटवाडीहून कुंभारवाडा ते पंचायत कार्यालयाजवळून गावकरवाडामार्गे गोयंगणे तळ्यापर्यंत हा कालवा नेण्याचा प्रस्ताव आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारी मार्गदर्शक तत्वांचे पालन करून मयेचे सरपंच तुळशिदास चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जलसंपदा खात्याचे वरिष्ठ अभियंता श्री. प्रसाद, अभियंते श्री. पराडकर अन्य अधिकारी तसेच डिचोली विभागीय कृषी अधिकारी संपती धारगळकर आणि सहायक अधिकारी, उपसरपंच विश्वास चोडणकर आणि पंच कृष्णा परब, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर उपस्थित होते. या बैठकीत मुळाक खाजन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यशवंत कारबोटकर, माजी सरपंच सुभाष किनळकर, सखाराम पेडणेकर, भाऊ शेट्ये, शिवा घाडी, प्रशांत किनळकर, दयानंद कळंगुटकर आदी मिळून २५ हून अधिक शेतकरी उपस्थित होते. अभियंते प्रसाद आणि पराडकर यांनी नियोजित कालव्याविषयी माहिती दिली. त्यावेळी सुभाष किनळकर, भाऊ शेट्ये आदी शेतकऱ्यांनी चर्चेत भाग घेवून विविध सूचना केल्या. नियोजित कालवा नेमका कोणत्या मार्गाने जाणार, त्यासाठी किती जमीन संपादीत करण्यात येईल. त्याविषयीचा पक्‍का आराखडा अगोदर तयार करा. नंतर कालवा हवा की नको. त्याबात शेतकऱ्यांची मते जाणून घ्या, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली. मये तलावातील गाळ उपसा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.

भटवाडीहून कालवा नकोच
ुपर्यटन स्थळ असलेल्या मये तलावात पाणीपुरवठा करायचाच असल्यास कालव्याऐवजी जवळच असलेल्या धबधबा येथील वेदांता खाण कंपनीच्या खाणपीठातील पाणी तलावात सोडा. तलावातील गाळ उपसा, अशी मागणी सुभाष किनळकर यांनी केली. भटवाडी परिसरातून जोड कालवा नकोच असे त्यांनी स्पष्ट करून या प्रस्तावाला भटवाडीतील शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे सांगितले. मयेतील नियोजित कालव्याच्या प्रस्तावाला भटवाडीतील अन्य शेतकऱ्यांनीही विरोध केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कालव्यासंबंधी पक्‍का आरखडा तयार करून नंतर शेतकऱ्यांची मते जाणून घ्या, अशी सूचना सरपंच तुळशिदास चोडणकर यांनी जलसंपदा खात्याला केली आहे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या