मिलिंद नाईक यांच्या इशाऱ्यावरून मतदार यादीत महाघोटाळा: संकल्प आमोणकर

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

मंत्री नाईक यांच्या दडपणाखाली येऊन मुरगावच्या मामलेदारांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा खेळ चालविला आहे, असे श्री. आमोणकर यांनी टीकास्त्र सोडले.

मुरगाव: मुरगाव मतदारसंघातील विशिष्ठ मतदारांची नावे यादीतून वगळण्यासाठी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक मामलेदारांवर दडपण आणीत असून त्यांच्या तालावर नाचून मामलेदार कोणतीही शहानिशा न करता तसेच बीएलओचा अहवाल न घेताच मतदारांची नावे यादीतून वगळत असल्याचा आरोप मुरगावमधील काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत केला. मंत्री नाईक यांच्या दडपणाखाली येऊन मुरगावच्या मामलेदारांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा खेळ चालविला आहे, असे श्री. आमोणकर यांनी टीकास्त्र सोडले.

नवीन मतदार यादी बनविण्याचे काम राज्यभर सुरू आहे. सर्वत्र इमानेइतबारे हे काम चाललेले असताना फक्त मुरगाव मतदारसंघात स्थानिक आमदार तथा मंत्री मिलिंद नाईक आणि त्यांच्या समर्थकांनी मुरगावच्या मामलेदारांवर दडपण आणून आपल्या इच्छेनुसार विशिष्ठ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात यावी, आपल्या मर्जीनुसार नवीन मतदारांना यादीत समाविष्ट करावे असे राजकारण सुरू केले आहे. हा प्रकार लोकशाहीला घातक असून मतदारांची नावे वगळणे, नवीन नावे यादीत समाविष्ट करणे हे काम बीएलओ कर्मचाऱ्यांचे आहे, पण त्यांना डावलून मंत्री नाईक यांच्या इशाऱ्यावरून मतदार यादीचे काम मुरगाव मामलेदार कार्यालयात सुरू असल्याचे श्री. आमोणकर यांनी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिले. पुन्हा ८०० नावे वगळण्यासाठी धडपड सुरू असल्याचेही ते म्हणाले.

मंत्री मिलिंद नाईक यांचे समर्थक माजी नगरसेवक मुरारी बांदेकर, लिओ रॉड्रिग्ज, शशिकांत परब, दामोदर कासकर यांनी आपापल्या प्रभागातील काहीजणांची नावे मतदार यादीतून गाळण्यासाठी मामलेदाराकडे पत्रव्यवहार केला आहे. मुरारी बांदेकर यांनी आपले निवासस्थान बायणातून वास्कोत मुंडवेल येथे स्थलांतरित करून दहा वर्षे झाली तरीही त्याने आपल्या कुटुंबातील सर्व जुन्याच फ्लॅटमध्ये राहत असल्याचा खोटा पत्ता देऊन मतदार यादीत नावे समाविष्ट करून घेतली आहे. तसेच काटेबायणा येथे एका घरात फक्त दोनच भाऊ वास्तव्यास असताना त्या घराच्या पत्त्यावर ३० जणांची नावे मतदार यादीत लिओ रॉड्रिग्ज यांनी समाविष्ट करून घेतली आहे हा एक मोठा घोटाळा आहे, असे श्री. आमोणकर यांनी सांगितले.

बायणा येथे नितीन चोपडेकर यांची चाळ होती. ती सध्या पाडून नवीन इमारत उभारण्याचे काम सुरू असताना त्या चाळीत शंभरहून अधिक मतदार असल्याचे मतदार यादीत नोंदविले आहे. या चाळीतील कोणीच मतदार तेथे राहत नसतानाही तसेच काहीजण आपल्या मूळ गावी स्थलांतर झालेले असतानाही त्यांची नावे मतदार यादीत कोणत्या आधारावर समाविष्ट करण्यात आली हे मामलेदारांनी स्पष्ट करावे, असे आव्हान श्री. आमोणकर यांनी मामलेदारांना दिले आहे.

सद्यस्थितीत मुरगाव मतदारसंघातील मतदार यादी बनविण्याची प्रक्रिया मंत्री मिलिंद नाईक यांनी हायजॅक केली आहे. उत्तरेचे खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र साईश नाईक मुरगावचे मामलेदार असताना मंत्री मिलिंद नाईक यांनी त्यांच्यावर दबाव टाकून आपल्या मर्जीनुसार मतदार यादी तयार करावी यासाठी हट्ट धरला होता, पण साईश नाईक यांनी दबावाखाली न येता नियमानुसार काम सुरू केले. याचा राग धरून त्यांची मुरगावमधून बदली केली, असे श्री. आमोणकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस गटाध्यक्ष महेश नाईक, शंकर पोळजी, सचिन भगत आणि अब्दुल रशीद उपस्थित होते.

आणखी वाचा

काँग्रेसचे प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख उर्फान मुल्ला यांची पक्षातून हकालपट्टी

संबंधित बातम्या