केरी-तेरेखोल पुलाच्या अपूर्ण कामाकडे दुर्लक्ष

प्रतिनिधी
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

उत्तर गोव्याचा मुख्य म्हणून पेडणे तालुका ओळखला जातो. याच पेडणे तालुक्यात तेरेखोल नदी पलीकडे तेरेखोलवासीयांना ये-जा करण्यासाठी गोवा मुक्त होऊन अर्धे शतक उलटले तरीही बेभरावश्या फेरीबोट सेवेवरच अवलंबून राहावे लागत आहे.

पेडणे: उत्तर गोव्याचा मुख्य म्हणून पेडणे तालुका ओळखला जातो. याच पेडणे तालुक्यात तेरेखोल नदी पलीकडे तेरेखोलवासीयांना ये-जा करण्यासाठी गोवा मुक्त होऊन अर्धे शतक उलटले तरीही बेभरावश्या फेरीबोट सेवेवरच अवलंबून राहावे लागत आहे. आजपर्यंत काही भागात पाणी, वीज या मुलभूत सेवा पुरवण्यास गोवा सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेजारच्या महाराष्ट्र सरकारवर तेरेखोलवासीयांना अवलंबून राहावे लागते.

तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या नदीवर ७५ कोटी रुपये खर्च करून पूल उभारण्यासाठी पायाभरणी केली होती. केरीच्या बाजूने पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र, जेव्हा तेरेखोल नदीतील खांब घालण्यासाठी प्रयत्न झाला त्यावेळी या पुलावरून राजकारण सुरू झाले. पूल बांधताना पर्यावरण दाखला घेतला नसल्याचा दावा करत गोवा फौउंडेशन संस्थेने हरिद लवादाकडे याचिका दाखल केल्याने या कामाला स्थगिती मिळाली. गतवर्षी हरिद लवादाकडून या पुलाला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे भविष्यात या पुलाचे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. सरकारने निधी उपलब्ध करून दिला तर पुलाचे रखडलेले काम मार्गी लागणार आहे.

पेडणे तालुक्यातील केरी-तेरेखोल पंचायत क्षेत्राचा एक तेरेखोल प्रभाग हा तेरेखोल नदीच्या पलीकडे असल्याने तेरेखोल भाग हा राज्याचा की, महाराष्ट्र राज्याचा असा प्रश्न उपस्थित होतो. कारण गोवा मुक्त होऊन अर्धे शतक उलटूनही तेरेखोलवासीयांना आजपर्यंत गोव्यातून वीज, शिक्षण, पाणी, आरोग्यसेवा यांचा पुरवठा होत नाही. या सोयी महाराष्ट्रातून पुरवल्या जातात.

तेरेखोल गावात २५० पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. राजकीयदृष्ट्या या गावाला तसे महत्त्व नाही. शंभरच्या आसपास मतदार आहेत. या ख्रिस्ती बांधवांची संख्या मोठी आहे. राजकीय लोकांमुळे पूर्ण तेरेखोल गावातील बारा लाख चौरस मीटर जमीन दिल्लीतील हॉटेल कंपनीला विकण्यात आली आहे. त्यामुळे पूर्ण गाव लीडिंग हॉटेलच्या ताब्यात आहे. काही कूळ मुंडकारांच्या जमिनी शिल्लक आहेत. या जमिनीविषयीही न्यायालयात खटला सुरू आहे. 

केरी-तेरेखोल पूल नसल्यामुळे तेरेखोलवासीयांना बेभरवशाच्या फेरीबोट सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. भरती ओहाटीवर ही फेरीबोट सेवा अवलंबून असते. तेरेखोल वासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी गोवा सरकारने आतातरी प्रयत्न करावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. 

फेरीबोट धक्का प्रस्ताव पडून
तेरेखोल वासीयांच्या सेवेसाठी केरी-तेरेखोल फेरीबोट सेवा आहे. केरीच्या बाजूने असलेल्या धक्यावर मोठ्या प्रमाणात वाळू साचत असल्याने फेरी धक्यावर आणताना बरीच कसरत करावी लागते. या ठिकाणी नवीन धक्का बांधावा म्हणून मंजूर झाला आहे, मात्र त्याचा पाठपुरावा केला जात नाही, असे बोलले जाते.

संबंधित बातम्या