हरवळे धबधब्यात दोन कोवळ्या युवकांचा दुर्दैवी मृत्यू

दैनिक गोमंतक
सोमवार, 12 एप्रिल 2021

जागतिक पर्यटन नकाशावर झळकलेला डिचोली तालुक्‍यातील हरवळे धबधबा पर्यटनासाठी प्रसिध्द असला, तरी आंघोळीसाठी हा धबधबा दिवसेंदिवस असुरक्षित बनत आहे. या धबधब्यावर आंघोळीची मजा लुटताना अतिउत्साह दाखवला, तर बऱ्याचदा ते जीवघेणे ठरत असते.

डिचोली: जागतिक पर्यटन नकाशावर झळकलेला डिचोली तालुक्‍यातील हरवळे धबधबा पर्यटनासाठी प्रसिध्द असला, तरी आंघोळीसाठी हा धबधबा दिवसेंदिवस असुरक्षित बनत आहे. या धबधब्यावर आंघोळीची मजा लुटताना अतिउत्साह दाखवला, तर बऱ्याचदा ते जीवघेणे ठरत असते. काल शनिवारी (ता. १०) या धबधब्यावर गोलू कुमार आणि सत्यम कुमार या दोन कोवळ्या युवकांचा झालेला दुर्दैवी अंत मिळून मागील चार वर्षांच्या आत जवळपास आठ पर्यटकांना या धबधब्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. पर्यटनासाठी प्रसिध्द असलेला हरवळे धबधबा पर्यटकांना आकर्षित करीत आहे. पावसाळ्यात तर हा धबधबा फेसाळून वाहत असल्याने पावसाळी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी हा धबधबा हाऊसफुल्ल होत असला, तरी वर्षभर या धबधब्यावर पर्यटकांची ये-जा चालूच असते. उन्हाळ्याच्या दिवसात तर या धबधब्यावर बरेचजण आंघोळीसाठी येतात. (The unfortunate death of two young men in Harwale Falls) 

गोव्यात होणार वैद्यकीय भरती; 50 डॉक्टर, 140 परिचारिकांची कंत्राटी पद्धतीने...

दरम्यान, कालच्या घटनेनंतर या धबधब्यावरील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकतर या धबधब्यावर धोकादायक क्षेत्रात आंघोळ करण्यासाठी कायमची बंदी घालावी. अन्यथा त्याठिकाणी जीवरक्षक तैनात करावेत, अशी मागणी जागृत नागरिकांकडून होत आहे. 

एका बाजूने हा धबधबा पावसाळी पर्यटनासाठी वरदान ठरत असला, तरी दुसऱ्या बाजूने या धबधब्यावर येणारे काही पर्यटक अतिउत्साही होत बेफिकीरपणे पर्यटनाचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. धबधब्याच्या पायथ्याशी पाण्यात उतरणे. असुरक्षित असतानाही काही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करीत असून पाण्यात धोक्‍याच्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेताना आढळून येतात. या धबधब्यावरील पर्यटकांच्या अतिउत्साहावर वेळीच आवर घातला नाही, तर बळी जाण्याच्या प्रकारावर नियंत्रण येणे अशक्‍य आहे. २०१७ च्या पावसाळी मोसमात तीन मिळून आतापर्यंत आठ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या २७ तारखेला या धबधब्यावर भालचंद्र पाटील या युवकाचा बळी गेला होता.  यावरून पर्यटनाचे आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण असले, तरी हा धबधबा तेवढाच असुरक्षित आहे. हे वास्तव नाकारता येणार नाही. 

जुने गोवेत रेल्वेच्या धडकेमुळे नौदल अधिकारी व एका महिलेचा मृत्यू

पर्यटकांकडून ‘फोटो सेशन’!
पावसाळ्यानंतर या धबधब्याचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी येणारे काही पर्यटक विशेष करून तरुणाई धोक्‍याच्या ठिकाणी पाण्यात उतरून पर्यटनाची मजा लुटत असतात. धबधब्याच्या पायथ्यासमोरील नदीचे पात्र खोल असून त्याठिकाणी आंघोळ करणे धोकादायक आहे. पर्यटकांचे याच धोकादायक ठिकाणी बळी गेले आहेत. धबधब्यावरील धोक्‍याची कल्पना नसलेल्या काही पर्यटकांकडून पाण्यात ‘फोटो सेशन’ केले जाते. 

त्यामुळे पर्यटकांचा हा अतिउत्साह नडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अतिउत्साहाच्या भरात पर्यटक खोल पाण्यात गेल्यानंतर बुडण्याच्या घटना घडतात. हे आतापर्यंतच्या दुर्दैवी घटनांवरून स्पष्ट झाले आहे. जागतिक नकाशावर प्रसिध्दीस पावलेल्या हरवळे धबधब्यावर पर्यटनाची मजा लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या अतिउत्साहावर वेळीच लगाम घालून सरकारने कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी होत आहे. बुडून बळी गेला की, या धबधब्यावर काही दिवस पोलिस तैनात करण्यात येतात. काही दिवसांनंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची माहिती मिळाली आहे.

संबंधित बातम्या