उत्तराखंड दुर्घटनेमुळे केंद्रीय मंत्री अमित शहांचा गोवा दौरा रद्द

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

कुडाळ - सिंधुदुर्गातील वैद्यकिय महाविद्यालयाच्या उद्‍घाटन कार्यक्रमानंतर गोव्यातील दौरा रद्द करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल संध्याकाळी उत्तराखंडला रवाना झाले.

पणजी :  कुडाळ - सिंधुदुर्गातील वैद्यकिय महाविद्यालयाच्या उद्‍घाटन कार्यक्रमानंतर गोव्यातील दौरा रद्द करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल संध्याकाळी उत्तराखंडला रवाना झाले. उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळण्याच्या दुर्घटनेमुळे तेथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांनी गोव्यातील दौरा रद्द केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्‍घाटनासाठी केंद्रीयमंत्री अमित शहा हे काल आले होते, त्यानंतर जाताना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार घेत असलेले केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेणार होते तसेच बांबोळी येथील एका तारांकित हॉटेलमधील भाजप प्रदेशच्या गाभा समितीच्या बैठकीला उपस्थिती लावून मार्गदर्शन करणार होते.

मात्र उत्तराखंडमध्ये चमोलीत धरण फुटून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याने त्यांना गोवा दौरा रद्द करावा लागला. त्यांच्यासोबत आलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा पाटील यांनी इस्पितळात जाऊन नाईक यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. केंद्रीयमंत्री सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने दाबोळी विमानतळावर केंद्रीयमंत्री अमित शहा यांचे आगमन झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तेथून ते थेट हेलिकॉप्टरने कुडाळ येथील वैद्यकीय महाविद्यालय उद्‍घाटनाला गेले.

गोव्यात आगमन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे काल गोव्यात दाबोळी हंस तळावर दुपारी आगमन झाले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले. सिंधुदुर्गात ओरोस जिल्हा मुख्यालय नजीक असलेल्या पडवे येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ‘लाईफ टाईम हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल कॉलेज’ला शासन मान्यता मिळाली आहे. या कॉलेजचे उद्‌घाटन करण्यासाठी त्यांचे काल दाबोळी हंस तळावर दुपारी 1 वाजता सीमा सुरक्षा दलाच्या खास विमानाने आगमन झाले. यावेळी त्यांचे हंस तळावर स्वागत करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. त्यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री शहा यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच याप्रसंगी हंस तळावर शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, सौ. सुलक्षणा प्रमोद सावंत उपस्थित होत्या. त्यांच्या हस्तेही मंत्री शहा यांना पुष्पगुच्छ देण्यात आले. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत यावेळी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उद्‌घाटन होणार होते. मात्र, शेतकऱ्‍यांच्या चक्काजाम आंदोलनामुळे अमित शहा यांचा दौरा रद्द झाला होता.आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा असल्याने राज्य प्रशासनाने सुरक्षिततेची काळजीपूर्वक रचना गेल्या दोन दिवसांपासून केली होती.

उत्तराखंड दुर्घटनेबाबत शोक 

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमकडा फुटून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेमुळे नदीचे पाणी वेगाने आल्याने रेनी गावात ऊर्जा प्रकल्पासाठी काम करत असलेले अनेक कामगार वाहून गेले आहेत. तेथील लोकांच्या सुरक्षिततेसाठी व आरोग्यासाठी प्रार्थना करतो असे मुख्यमंत्र्यानी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

 

संबंधित बातम्या