केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईकांच्या प्रकृतीत सुधारणा; ‘एम्‍स’च्‍या डॉक्टरांकडून तातडीने उपचार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हेसुद्धा त्यांच्या आरोग्याची विचारपूस करीत आहेत. उद्या सकाळी पुन्हा एकदा त्यांना तपासले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पणजी: केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती सोमवारी काही प्रमाणात खालावली होती. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने दिल्ली येथील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या खास पथकाला तातडीने गोव्यात बोलाविण्यात आले. रात्री उशिरा हे पथक दाखल झाले. ‘एम्स’मधील डॉ. राजेश्वरी आणि डॉ. अनंत मोहन यांच्यासह पथकाने श्रीपादभाऊंना तपासले, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या उपचारांची दिशा योग्य आहे. त्यांच्या प्रकृतीत होणारी सुधारणा पाहता त्यांना दिल्लीत उपचारासाठी नेण्याची गरज नसल्याचे ‘एम्स’मधील डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हेसुद्धा त्यांच्या आरोग्याची विचारपूस करीत आहेत. उद्या सकाळी पुन्हा एकदा त्यांना तपासले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री नाईक यांची एक कोविड पडताळणी चाचणी निगेटिव्ह आली असून दुसरी आज करण्यात येणार आहे.

मुख्‍यमंत्र्यांकडून विचारपूस
मणिपाल रुग्णालयात त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपीचे उपचार करण्यात आले आणि या उपचारांना त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याची माहितीही देण्यात आली होती. दरम्यान, १८ रोजी दिल्ली येथून ‘एम्स’ रुग्णलयातील दोन डॉक्टरांचे पथक गोव्यात आले होते. या पथकानेही नाईक यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली होती. यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी मणिपाल रुग्णालयात भेट देत मंत्री नाईक यांच्यावर सुरू असणाऱ्या उपचारांची माहिती आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूसही केली.

‘एम्स’चे पथक राज्‍यातील कोविड यंत्रणा पाहणार
राज्यात सुरू असणारे कोविडबाबतचे नियोजन, प्रोटोकॉल आणि येथील रुग्णांना दिली जाणारी उपचारप्रणाली याबाबद्दल एम्समधून आलेले पथक पाहणी करणार असल्याची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. याशिवाय गोमेकॉलाही हे पथक भेट देणार असून पथकासोबत बैठक घेणार असल्याचेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले. 

दरम्‍यान, श्रीपाद नाईक यांच्‍या सोमवारी अचानक बिघडलेल्‍या परिस्‍थितीमुळे व डॉक्‍टरांनी त्‍वरित उपचार केल्‍याने प्रकृती सुधारली. त्‍यांची प्रकृती आता स्‍थिर असल्‍याची माहिती त्‍यांचा मुलगा सिद्धेश नाईक यांनी सांगितले. एम्‍समधील डॉक्‍टरांकडून त्‍यांच्‍यावर विशेष देखरेख ठेवण्‍यात आल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. त्‍यांची प्रकृती सुधारत असल्‍याने दिल्लीतील एम्‍स इस्‍पितळात त्‍यांना उपचारासाठी आवश्‍‍यकता नाही, असे एम्‍समधील गोव्‍यात दाखल झालेल्‍या डॉक्‍टरांच्‍या पथकाने सांगितल्‍याच्‍या माहितीला श्री. सिद्धेश यांनी दुजोरा दिला.

सोमवारी काय झाले?
मंत्री नाईक यांच्या फुफ्फुसांचे इन्फेक्शन काही प्रमाणात वाढले होते. ऑक्सिजनची मात्राही कमी झाली होती. मात्र, काही वेळातच त्यांची तब्येत पुन्हा स्थिर होण्यास सुरवात झाली. मंत्री नाईक हे उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून ते पूर्ण शुद्धीवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंत्री श्रीपाद नाईक गेल्या काही दिवसांपासून मणिपाल रुग्णालयात कोरोनावरील उपचार घेत होते. १२ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतःच्या ट्विटरच्या खात्यावरून दिली होती. त्यानंतर ते त्यांच्या घरीच क्वारंटाईन होते. मात्र, त्यांच्यात कोरोनाची लक्षणे निर्माण होऊ लागल्याने त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. 

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना कोणतेही व्यसन नाही. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले आहे. गेले काही दिवस त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती. मात्र, अचानक त्यांची तब्येत थोड्या प्रमाणात खालावल्याने केवळ काळजी आणि अधिक दक्ष असण्यासाठी ‘एम्स’मधील डॉक्‍टरांचे पथक बोलावून घेतले आहे. आता त्यांची तब्येत स्थिर असून ते लवकरच बरे होतील.
- डॉ. शेखर साळकर, मणिपालमधील डॉक्‍टर

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या