अनोखी 'टिफिन फॅक्टरी'

टिफिन फॅक्टरी हे खरोखरीच अनोखे असे क्लाउड किचन आहे आणि या क्लाउड किचनमुळे अनेकांची सोय झाली आहे
tiffin factory goa
tiffin factory goaDainik Gomantak

कोरोनाचा काळ होता. हॉटेल व्यवसाय बंद पडतोय की काय असे वाटत असताना लॉकडाऊनचा काळ संपून सगळे कसे पूर्ववत झाले. लोकदेखील या परिस्थितीतून बाहेर पडले. हॉटेलच नाहीतर सर्व व्यवसाय पूर्ववत झाले. पण तरीही रेस्टोरंटमध्ये जाऊन जेवायला भीती वाटत होती. याच काळात कधीतरी पहिल्यांदा बाहेरच्या जेवणाची ऑर्डर दिली होती.

स्वीगी - झोमॅटोसारख्या ॲपवर बराच शोध घेतल्यावर ‘टिफिन फॅक्टरी’ नावाचे ‘टेक अवे’ सेवा पुरवणारे ‘क्लाउड किचन’ सापडले. आता तुम्ही म्हणाल की ‘क्लाउड किचन’ हा काय नवीन प्रकार? तर क्लाउड किचन म्हणजे व्यावसायिक स्वयंपाकघर. ज्याचा वापर केवळ डिलिव्हरी किंवा ‘टेक अवेसाठी’ अन्न तयार करण्याच्या उद्देशाने होतो आणि ज्यामध्ये जेवणासाठी ग्राहक नसतात म्हणजे इथे बसून जेवायची सोय नसते.

फक्त ‘टेक अवे’ काउंटर असतो. क्लाउड किचनसारखी संकल्पना आता मोठ्या शहरांमध्ये झपाट्याने रुजतेय. ‘द टिफिन फॅक्टरी’ हे एक क्लाउड किचन असून पणजीतील सांतिनेज भागात आणि ‘गोमन्तक’ कार्यालयाच्या समोरच्या भागात ‘टिफिन फॅक्टरी’चे एक आउटलेट आहे.

tiffin factory goa
Goa fire department : ‘अग्निशमन’कडून वर्षभरात 103 जणांना जीवदान

चार खादाड मित्र. ज्यांना चवीने खायची आवड आहे. हे चौघे जेव्हा केव्हा जेवायला एकत्र यायचे तेव्हा वेगवेगळे पदार्थ, त्यांची चव, कुठे काय चांगले मिळते यावर त्यांच्या गप्पा रंगायच्या. त्यांच्या या चवदार गप्पांमधून ‘द टिफिन फॅक्टरी’ची संकल्पना प्रत्यक्षात उतरली.

समीर आणि त्यांची पत्नी सुप्रिया बोरकर, डॉ. विभास प्रभुदेसाई आणि डॉ. आन्सिया वाझ या चार मित्रांच्या वारंवार एकत्रित केलेल्या खादाडीतून टिफिन फॅक्टरी साकार झाली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

मी तर यांच्या ‘टिफिन फॅक्टरी’ या नावानेच आकर्षित झाले. नाव बघून मोठ्या उत्सुकतेने त्यांचा मेन्यू बघायला घेतला आणि त्यात खूप काही वेगळे हाती लागले. या सर्वांनी बराच विचारपूर्वक मेन्यू तयार केला आहे हे जाणवले.

टिफिन बॉक्स प्रकारातच खूप वैविध्य आहे. तुम्ही शाकाहारी -मांसाहारी कोणीही असा तुम्हांला तुमच्या पद्धतीचे पदार्थ यात आहेत. टिफिन फॅक्टरी सिग्नेचर बॉक्सेस, गोवन बॉक्सेस, थाई -चायनीज बॉक्सेस, देसी बॉक्सेस, पास्ता बॉक्सेस, बिर्याणी बॉक्सेस इतके विभाग असून या प्रत्येक विभागात आठ -दहा प्रकारचे पदार्थ आहेत.

टिफिन फॅक्टरी सिग्नेचर बॉक्सेसमध्ये ग्रिल्ड चिकन बॉक्स, प्रॉन्स बलचाव बॉक्स, इंडोनेशिअन स्पेशल नासी गोरेंग बॉक्स जो चिकन, प्रॉन्स आणि शाकाहारीदेखील बनवला जातो. अशा आगळ्या वेगळ्या प्रकारचे सिग्नेचर पदार्थ यात आहेत.

गोवन बॉक्सेस या विभागात आठ प्रकारचे खास गोवन पदार्थ असलेले बॉक्स आहेत. ज्यात साहजिकच फिश करी राईस बॉक्स आहे. याशिवाय प्रॉन्स करी राईस, चिकन कॅफ्रिआल बॉक्स, प्रॉन्स शाकुती, अंडा शाकुती, मशरूम शाकुती बॉक्स यात आहेत. गोमंतकीय घरातल्या जेवणाची खास चव यातल्या प्रत्येक पदार्थाला आहे. जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी खास व्हेज काफ्रिआलदेखील आहे.

माझ्यासारखी जी चिकन -मटण खात नाही पण कॅफ्रिआल मसाला खाऊन बघायची इच्छा होते त्यांच्यासाठी व्हेज कॅफ्रिआल हा छान पर्याय ठरतो. मुद्दाम खाऊन बघावेत असे थाई आणि चायनीज बॉक्सेस गोमंतकीय पदार्थांसोबतच थाई आणि चायनीज पदार्थदेखील टिफिन फॅक्टरीची स्पेशालिटी आहे. मला इथला लाल रंगाची थाई करी आणि गरम गरम भात फार आवडतो. याशिवाय शेजवान नूडल्स, फ्राइड राइस, ट्रिपल शेजवान राइस, अमेरिकन चॉप्सी हे पदार्थदेखील मुद्दाम खाऊन बघावेत, असे आहेत.

इथल्या सर्व प्रकारच्या थाई करीची चव मला आवडते. थाई करीचा लाल रंग आणि पांढरा शुभ्र भात ही रंगसंगती अतिशय आकर्षक वाटते. घरातल्या प्रत्येकासाठी पदार्थ असावेत याकडे खास लक्ष देण्यात आले आहे. घरातल्या मुलांना - तरुण पिढीला चायनीज - थाई पदार्थांचे वाटणारे आकर्षण लक्षात घेऊन या वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून अतिशय चविष्ट अशा चायनीज पदार्थांचा समावेश केला आहे.

ज्यांना गोवन आणि चायनीज - थाई पदार्थ नको अशांसाठी ’देसी बॉक्स’मध्ये बटर चिकन, पनीर माखनी, दाल राइस, दाल खिचडी, कर्ड राइस या पदार्थांचे टिफिन बॉक्स आहेत शिवाय सर्व प्रकारची बिर्याणी देखील आहे. तुमचा टिफिन बॉक्स तुम्ही तयार करा इतक्या वैविध्यपूर्ण पदार्थांमधून तुम्हांला हवे ते पदार्थ निवडून तुम्हीच टिफिन बॉक्स बनवू शकता, अशी सोयदेखील आहे.

‘कॉम्बो’ पदार्थ निवडून एकाच वेळी गोवन - चायनीज, गोवन - थाई, गोवन - पंजाबी अशा कोणत्याही पदार्थांची संगती तुम्ही लावू शकता. बटर चिकन, मुर्ग का खुर्चान, चिकन शाकुती आणि फ्राईड राइस अशी अनेकजण ऑर्डर देतात. याशिवाय चिकन कॅफ्रिआल पॉकेट म्हणजेच आपली पोई पावामध्ये चिकन कॅफ्रिआल घालून केलेले बर्गर.

याच पद्धतीने बटर चिकन पॉकेट, गोवन कटलेट पाव, क्रंची फ्राईड चिकन पाव असे छोट्या भुकेसाठी अनेक प्रकार इथे आहेत. याशिवाय सॅन्डविच, पेरी पेरी फ्राईज, चिकन लॉलीपॉप, चिकन फ्राईड वॉण्टन, असले चटकदार पदार्थदेखील तुम्ही ऑर्डर करू शकता. जपानमध्ये असे जेवणाचे ‘बेंतो बॉक्स’ सहजपणे सगळीकडे मिळतात. त्यातदेखील अतिशय वैविध्य असलेले पदार्थ असतात.

श्रावण महिन्यात शुद्ध शाकाहारी

गोवेकरांसाठी श्रावण महिना खास असतो. अनेकजण या दिवसात शुद्ध शाकाहारी - सात्त्विक पदार्थ खातात हे लक्षात घेऊन टिफिन फॅक्टरीने त्या पद्धतीचे बॉक्स तयार केले होते जे अतिशय लोकप्रिय झाले.

वरण-भात-तूप, एखादी भाजी-भजी, भाज्यांच्या कुरकुरीत फोडी आणि खीर असा स्वादिष्ट असा श्रावण स्पेशल बॉक्स यांनी तयार केला होता. टिफिन फॅक्टरी हे खरोखरीच अनोखे असे ‘क्लाउड किचन’ आहे आणि या क्लाउड किचनमुळे अनेकांची सोय झाली आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com