अज्ञात व्यक्तीने ओहोळात रासायनिक द्रव्य सोडले

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

कामुर्ली येथील ओहोळत काल अज्ञात व्यक्तीने रासायनिक द्रव्य सोडल्याने ओहोळतील मासळी मृत पावली असून या पाण्याचा वापर गुरे पिण्यासाठी करत असल्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सासष्टी : कामुर्ली येथील ओहोळत काल अज्ञात व्यक्तीने रासायनिक द्रव्य सोडल्याने ओहोळतील मासळी मृत पावली असून या पाण्याचा वापर गुरे पिण्यासाठी करत असल्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यासाठी मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात कामुर्ली पंचायतीने तक्रार नोंद केली आहे. 

या ओहोळात रासायनिक द्रव्य सोडल्याने पाणी दूषित होऊन त्यातील मासळी मृत झाली आहे. या पाण्याचा वापर गुरे पिण्यासाठी तसेच शेतकरी शेती करण्यासाठी करीत असून मनुष्य व प्राण्यांच्या जीवाला धोका उदभवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ज्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती कामुर्लीचे उपसरपंच मारियो डिसोझा यांनी दिली. 

शेतकरीवर्ग गुरांना चरण्यासाठी या ओहोळच्या परिसरात सोडत असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी गुरांना न सोडण्याची सूचना देण्यात आली आहे. अशा घटनांवर रोख लावण्यासाठी पोलिसांनी कारवाई करण्यासंबंधी प्रदूषण नियंत्रण मंडळास कळविण्यात येणार आहे, अशी माहिती पंच आश्विन नाईक यांनी दिली.

संबंधित बातम्या