धक्कादायक..! अज्ञातांनी जबरदस्ती करत युवतीला पाजले सॅनिटायझर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

युवती केपे येथे राहत असून ती चांदरमधील एका ब्युटी पार्लरमध्ये कामाला आहे. नेहमीप्रमाणे ही युवती कामाला जाण्यासाठी निघाली असता, चांदर परिसरात पोहचल्यार दोन युवकानी तिची अडवणूक केली व बळजबरीने डेटॉल सॅनिटाईजरची बाटली पाजली.

सासष्टी- चांदर येथे दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या 18 वर्षीय युवतीची अडवणूक करून दोन तरुणांनी तिला जबरदस्तीने सॅनिटाईजरची बाटली पाजल्याची घटना काल सकाळी घडली. पीडित युवतीवर इस्पितळात उपचार करून घरी पाठविण्यात आले असून याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. 

मायणा कुडतरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल सकाळी ९.३० वाजता चांदर परिसरात घडली. ही युवती केपे येथे राहत असून ती चांदरमधील एका ब्युटी पार्लरमध्ये कामाला आहे. नेहमीप्रमाणे ही युवती कामाला जाण्यासाठी निघाली असता, चांदर परिसरात पोहचल्यार दोन युवकानी तिची अडवणूक केली व बळजबरीने डेटॉल सॅनिटाईजरची बाटली पाजली. युवतीने आरडा ओरडा केल्यावर संशयितांनी तेथून पळ काढला. 

त्या युवतीला त्वरित कुडतरी प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आले. केंद्रात तिच्यावर उपचार केल्यावर निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी कालच तिला मडगाव हॉस्पिसिओ इस्पितळात पाठविण्यात आले होते. आज सदर युवतीला घरी पाठविण्यात आले. युवती त्या तरुणांना ओळखत नसल्यामुळे अडविणारे संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसून युवतीची जबानी नोंद केल्यावर पोलिसांना संशयितांना पकडण्यास शक्य होणार आहे. याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी भादंसंच्या ३४१ आणि ३२८ या कलमाखाली अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. 

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर - कामत

 गिरदोली -  चांदर येथे युवतीला वाटेत अडवुन जंतुनाशक पाजण्याच्या घटनेने राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे परत एकदा उघड झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्वरित या घटनेकडे लक्ष देऊन गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे. 
 

संबंधित बातम्या