कावरे गावातून अमर्याद खनिज वाहतूक

Dainik Gomantak
शुक्रवार, 22 मे 2020

‘गाकुवेध’ संघटनेतर्फे गोवा खंडपीठात जनहित याचिका

पणजी

केपे तालुक्यातील कावरे गावात अमर्यादपणे सुरू असलेल्या खनिज वाहतूकप्रकरणी ‘गाकुवेध’ या आदिवासी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका सादर केली आहे. या खनिज वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा परिणाम कावरेतील लोकांच्या आरोग्याला होत असल्याने या याचिकेवर तातडीने उद्या (ता. २२) सुनावणी घेण्याची विनंती खंडपीठाला करण्यात आली आहे.
कावरे या खाण क्षेत्रातील गावातून जाणाऱ्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात खनिजवाहू ट्रकांची वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे धूळ प्रदूषणाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. या धूळ प्रदूषणामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रस्त्यावरून खनिजवाहू ट्रकांना दिवसागणिक ठराविक फेऱ्या घालण्यास मर्यादा घालून दिली जात आहे. तासाला २५ ट्रकांना परवानगी असताना सुमारे दिडशे ट्रक या रस्त्यावरून धावत असतात. त्यामुळे संतप्त झालेल्या कावरेवासियांनी काही दिवसांपूर्वी हे खनिजवाहू ट्रक रोखून धरले होते. पोलिसांनी खनिजवाहू ट्रकांच्या फेऱ्यांप्रकरणी गंभीर दखल घेत नियमांचे व कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर
ही खनिज वाहतूक बेमर्यादपणे सुरूच आहे. या रस्त्यावरून खनिजवाहू ट्रक अधिकाधिक फेऱ्या मारता याव्यात यासाठी भरधाववेगाने ते चालविले जातात त्यामुळे या गावातील लोकांना वाहने चालविणे धोकादायक बनले आहे. तासाला केवळ २५ खनिजवाहू ट्रक धावतील असे खाण खात्यातर्फे सांगण्यात आले होते. सरकारी यंत्रणा कोविड - १९ विरोधातील लढ्यात गुंतली असल्याने त्याचा हा फायदा घेत खनिजवाहू ट्रक प्रमाणापेक्षा अधिक फेऱ्या तासागणिक मारत आहेत. या बेमर्याद वाहतुकीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने खनिजवाहू ट्रकचालकांचे चांगलेच फावले आहे. कोविड - १९ या विषाणुमुळे श्‍वसनाशी संबंधित आजार होतो. या ट्रकांवरील चालक हे बहुतेक परप्रांतीय असल्याने तसेच धूळ प्रदूषणामुळे हा आजार येथील स्थानिकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी बाजू याचिकेत मांडण्यात आली आहे.
कावरे भागातील खाणींना कावरेवासियांचा विरोध आहे. दशकभरापूर्वी बंद असलेल्या खाणीला बेकायदेशीरपणे सुरू करण्यासाठी परवानगी दिली म्हणून पणजीतील खाण खात्याच्या मुख्य कार्यालयात कावरेवासियांनी धाव घेतली होती. त्यांनी खाण संचालकांना त्यांच्या कक्षाबाहेर पडू दिले नव्हते. अखेर रात्री खाण बंद केल्याचा आदेश खाण संचालकांना द्यावा लागला होता. तेच कावरेवासीय आता अमर्याद खनिज वाहतूक रोखण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
कावरे गावात अमर्याद खनिज वाहतुकीप्रकरणी केपे पोलिसांनी ग्रामस्‍थ, पंचायत यांच्‍या घेतलेल्‍या संयुक्त बैठकीत विरोध करणाऱ्या स्थानिक नेत्यांनाही सहभागी करून बैठक घेतली होती. खाण कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतुकीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परवानगी दिल्याचे ते म्हणाले मात्र, खाण कंपन्यांचे प्रतिनिधी तशी कोणतीही परवानगी सादर करू शकले नाहीत. खाण खात्याने खनिज वाहतुकीसाठी लागू केलेले नियम आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातलेल्या अटी यांचे पालन होत नसल्याकडेही ग्रामस्थांनी पोलिसांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर खाण कंपन्यांनी सर्व नियमांचे सक्तीने पालन करावे अशी सूचना पोलिसांनी केली तरी त्याला बगल देऊन ही अमर्याद खनिज वाहतूक सुरूच आहे असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या