अनलॉक ४: गोव्याच्या सीमा १६१ दिवसांनी खुल्या

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

राज्यात रस्ता, रेल्वे व हवाईमार्गे येणाऱ्या व्यक्तीला आरोग्य चाचणीची सक्ती केली जाऊ नये. केवळ आंतरराष्ट्रीय प्रवाशाला (रस्ता, रेल्वे, हवाईमार्गे) आरोग्य चाचणीची सक्ती असेल.

पणजी: अखेर १६१ दिवसांनी राज्याच्या सीमा उद्यापासून (ता.१) खुल्या होणार आहेत. राज्य कार्यकारी समितीच्या आज झालेल्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. तसेच राज्यात रस्ता, रेल्वे व हवाईमार्गे येणाऱ्या व्यक्तीला आरोग्य चाचणीची सक्ती केली जाऊ नये. केवळ आंतरराष्ट्रीय प्रवाशाला (रस्ता, रेल्वे, हवाईमार्गे) आरोग्य चाचणीची सक्ती असेल. बार, स्पा व मसाज पार्लर उद्यापासून (ता.१) खुले केले जातील. कसिनो व जलविहार यांच्‍यावरील बंदी कायम असेल, असेही या बैठकीत ठरवण्यात आले आहे.

या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्‍वांनुसार राज्याच्या सीमा १ सप्टेंबरपासून खुल्या केल्या जातील. राज्यातील बारही उद्यापासून सुरू केले जातील, अशी माहिती देऊन ते म्हणाले, गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना कोविड चाचणीची सक्ती केली जाणार नाही, असे ते म्हणाले. शाळा सुरू करण्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. २१ सप्टेंबरनंतर त्याविषयी निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गोमेकॉचे चार कक्ष कोविडसाठी
मुख्यमंत्र्यांनी आज आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आरोग्‍य सचिव नीला मोहनन यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांकडून कोविड महामारी व्यवस्थापनाचा आढावा घेतला. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील चार कक्ष हे कोविड व्‍यवस्थापनासाठी वापरले जात आहेत. कोविड इस्पितळातील २१० खाटा भरल्या असून, फोंडा येथे कोविड रुग्ण पाठवणे आजपासून सुरू करण्यात आले आहे. काही उपकरणे घ्यायची आहे, त्यांची खरेदी सुरू आहे. फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात काही उपकरणे बसवण्यात येतील. आजवर १८० जणांनी कोविड महामारीच्या काळात प्राण गमावले आहेत. त्याचे विश्लेषण करण्यात येत आहे. किती जणांना मरण पावल्यानंतर इस्पितळात आणले आणि किती जणांना इतर आजार होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला याची माहिती घेतली जात आहे. २४ तासात किती जणांचा मृत्यू झाला, ही माहितीही संकलीत केली जात आहे.

जनतेला आवाहन
कोविड महामारीच्या काळात जराही लक्षणे दिसली की जनतेने तपासणी करून घ्यावी. लक्षणे बळावेपर्यंत थांबू नये असे आवाहन करून ते म्हणाले, वेळीच उपचार घेतले तर कोविडच्या लागणीतून बरे होता येते हे नव्वद वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनी सिद्ध करून दाखवले आहे. कोविडची लागण झालेल्या सात मातांनी मुलांना सुरक्षित जन्म दिला त्यासाठी सिझेरीयन शस्त्रक्रिया केल्‍या गेल्या आहेत. कोविडची लागण झालेल्या ५० माता नैसर्गिकरीत्या प्रसुत झाल्या. त्या सर्वांची बालके सुरक्षित आहेत. बऱ्याच माता व बालके आपल्या घरीही पोचली आहेत. मूत्रपिंड निकामी झालेले काही रुग्ण कोविडमधून बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे वेळीच उपचार सुरू करणे आवश्यक आहेत.

हे सुरू होणार...

  • बार खुले,
  • स्पा व मसाज पार्लर 

हे बंद राहणार...

  • कसिनो व जलविहार, 
  • शाळा निर्णय २१ सप्‍टेंबरनंतर

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या