अवकाळी पावसामुळे गोमंतकीयांची उडाली तारांबळ

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

दिवसभर ढगाळ वातावरण राहून रात्री अकरानंतर राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या

मडगाव: दिवसभर ढगाळ वातावरण राहून रात्री अकरानंतर राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. मडगाव, सांगे, वास्को, डिचोली, वाळपई, आदी ठिकाणी अचानक वादळी वारा व पाऊस झाला. यामुळे लोकांची धांदल उडाली.

मडगावसह, सासष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी आज रात्री पावसाने हजेरी लावली. रात्री दहाच्या दरम्यान मडगावात ढगांच्या गडागडाटासह पाऊस सुरू झाला. रात्री साडेअकरपर्यंत पाऊस सुरू होता. रात्री उशिरा घरी परातणारे प्रवासी व दुकानदारांची पावसामुळे तारांबळ उडाली.

सांगे भागात रात्री साडेनऊच्या दरम्यान गडगडाटासह तासभर पाऊस पडला. सांगेपासून नेत्रावळीपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. गेले दोन तीन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यात थंडी गायब झाल्याने पावसाची एखादी सर कोसळण्याची शक्यता ज्येष्ठ लोक व्यक्त करीत होते. पण, पाच दहा मिनिटाची पावसाची सर न पडता किमान तास भर गडगडाट व वाऱ्यासोबत पाऊस पडत होता. अचानक पडलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ उडाली. बांधकाम साहित्य, सिमेंट, भाताची कापणी केलेल्यांची अंधारात धांदल उडाली होती. काणकोण परिसरातही पावसाने हजेरी लावली. रात्री ९ वाजता सुरू झालेला पाऊस साडे दहानंतरही सुरूच होता.

आणखी वाचा:

शिकार करण्यासाठी जंगलात गेलेल्याचीच झाली शिकार -

दरम्यान, वास्को परिसरात जोरदार पावसामुळे रात्री उशिरा वीजप्रवाह खंडित झाला होता. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचून परिसराला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. रात्री उशिरापर्यंत वीजप्रवाह खंडित झाल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली. रात्री उशिरापर्यंत पडलेल्या पावसामुळे काही भागात लोकांची धांदल उडाली होती.

दरम्यान, डिचोली भागात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. विजेचा लखलखाट आणि गडगडाटासह रात्री डिचोली शहरासह बहुतेक भागात पर्जन्यवृष्टी झाली. वाळपई भागातील ग्रामीण क्षेत्रात आज (गुरुवारी) रात्री साडेदहानंतर काही गावात पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची धावपळ झाली. वाळपई भागात नगरगाव, धावे, आंबेड, वेळूस आदी गावात पाऊस कोसळला. काही ठिकाणी शेतीमालाला याचा फटका बसला आहे.

चिखलीत रात्री अचानक झालेल्या वायूगळतीमुळे भीतीचे वातावरण -

बोळकर्णे साकोर्डा परिसरात आज संध्याकाळी पावणे सातच्या दरम्यान पावसाने अचानक दमदार हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. परिसरात दमदार पडलेल्या पावसामुळे वातावरणात ओलावा पसरल्याने नागरिक सुखावले होते. परिसरात पावसाच्या शिडकाव्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार घडला. काही भागात काळोखाचे साम्राज्य पसरले होते. शेतकऱ्यांनी तरव्याचे बियाणे पेरले असून पावसाच्या पाण्यात प्रवाहात बियाणे वाहून जाणार असल्याने ते चिंतातूर बनले आहे. या भागात पावसाची रिमझिम उशिरापर्यंत सुरु होती. मोले परिसरात पावसाचा शिडकाव झाला.

संबंधित बातम्या