'नोकऱ्या मिळवणारे नव्‍हे, तर नोकऱ्या देणारे व्हा'

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

‘एनआयटी’सारख्या शिक्षणाचे महत्त्‍व जाणणाऱ्या आणि शिक्षणाचा उपयोग तंत्रज्ञानाच्या पातळीवर लोकांनी देशासाठी करावा म्‍हणून झटणाऱ्या संस्थेत तुम्ही शिकला आहात. तुमच्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा उपयोग नोकरी मिळविण्यासाठी नाही, तर इतरांना नोकऱ्या देण्यासाठी करा, असे आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केले.

पणजी :  ‘एनआयटी’सारख्या शिक्षणाचे महत्त्‍व जाणणाऱ्या आणि शिक्षणाचा उपयोग तंत्रज्ञानाच्या पातळीवर लोकांनी देशासाठी करावा म्‍हणून झटणाऱ्या संस्थेत तुम्ही शिकला आहात. तुमच्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा उपयोग नोकरी मिळविण्यासाठी नाही, तर इतरांना नोकऱ्या देण्यासाठी करा, असे आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केले. ‘एनआयटी’ गोवाच्या सातव्‍या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा व्‍हर्च्युअल पद्धतीने घेण्यात आला. यावेळी ‘एनआयटी’ गोवाचे संचालक गोपाल मुगेरया आणि अन्‍य प्राध्यापकसुद्धा उपस्थित होते. यावेळी ६ पीएचडी, ३६ एम टेक आणि ६९ बी टेकच्या पदव्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आल्या.

‘आत्‍मनिर्भर भारताचे स्‍वप्‍न साकार करूया’

देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत आपणा सर्वांनाच ज्ञात आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने तुम्ही देशासाठी सत्कार्य करावे, अशी आमची अपेक्षा आहे. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान आणि जय किसान’ हा नारा दिला होता. आमचे जवान, आमचे युवक हीच आमच्या देशाची खरी ताकद आहेत आणि ती ताकद आम्ही ओळखून आहोत. आपल्या देशाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे आता आपण प्रगतीच्याबाबतीत कोठेही मागे पडायचे नाही. आता आपल्याला आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असल्याचे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायला हवे, असे यावेळी शिक्षणमंत्री म्हणाले.

तंत्रज्ञानात प्रगती करण्‍याचे युवकांना आवाहन

 देशाला तंत्रज्ञानाच्या बाबतीत तुमच्यासारख्या युवकांची गरज आहे. आपण देशाची तंत्रज्ञानाच्या पातळीवर प्रगती करायची आहे. आपण प्रत्येक बाबतीत खूपच सरस आहोत, याची ओळख जगाला करून देण्याची वेळ आली आहे. आता तुमच्यासमोर खूप प्रश्न पडतील आणि प्रश्न पडणे हे चिकित्सक असण्याचे लक्षण असल्याने प्रश्न पडणे चांगले आहेत. त्यामुळे स्वतःच्या प्रगतीसाठी आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे शोधा आणि देशाच्या, समाजाच्या भलेपणासाठी आपले योगदान द्या, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले.

संबंधित बातम्या