मोबाईल्सचा वापर प्रगतीसाठी करा : संजय वालावलकर

वार्ताहर
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

कोविड १९ या महामारीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शाळाही बंद आहेत. त्यामुळे सरकारने शाळेतील मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकणे सुरू केले आहे.

पर्वरी: कोविड १९ या महामारीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शाळाही बंद आहेत. त्यामुळे सरकारने शाळेतील मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकणे सुरू केले आहे. पण त्यातही अनेक समस्या आहेत. काही ठिकाणी नेटवर्क मिळत नाही तर काही मुलांकडे मोबाईल संच नाही. गरीब मुलांची समस्या जाणून येथील  रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेने पुढे येऊन केवळ मुलांचे मोबाईलमुळे शिक्षण अपूर्ण राहू नये, या उद्देशाने शाळेतील मुलांना मोबाईल संच भेट दिले आहेत. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करणे आवश्‍यक आहे. मुलांनी या मोबाईल्सचा उपयोग आपल्या शिक्षणासाठीच करून प्रगती करावी, असे आवाहन प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर यांनी केले.  श्रीमती सुनंदाबाई बांदोडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लबतर्फे आज मोफत मोबाईल संच वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष रमेश तिवारी, माजी अध्यक्ष राजन नाईक, खजिनदार नित्यानंद महाले, जन शिक्षण संचालक तथा हायस्कूलच्या व्यवस्थापकीय समिती सदस्य श्रीहरी आठल्ये, हायस्कूलच्या व्यवस्थापकीय समिती सदस्य दत्ता शिरोडकर व मुख्याध्यापक डॉ. नीता साळुंके उपस्थित होते.

शिक्षणाशिवाय व्यक्तीची खरी प्रगती होत  नाही. तसेच एकही विद्यार्थी शिक्षणाशिवाय वंचित राहू नये, या हेतूने आम्ही आज या शाळेतील मुलांना मोबाईल संच भेट दिले आहेत. मुलांनी या मोबाईलचा उपयोग आपल्या शिक्षणासाठीच करावा. जो विद्यार्थी येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क घेऊन पास होणार आहेत त्यांना योग्य बक्षीस दिले जाईल, असे रोटरी क्लबचे अध्यक्ष रमेश तिवारी यांनी सांगितले.

त्यानंतर कावेरी मालीगीट्टी, कोमठी गावंडर, रुक्साना दारगड, अजय शर्मा, समृध्दी आकेरकर, इस्माइल शेख, प्रिया शर्मा, सिमरन दस्तीकोप या मुलांना पाहुण्यांच्या हस्ते मोबाईल संच भेट देण्यात आले. डॉ. नीता साळुंके यांनी स्वागत व पाहुण्यांची ओळख करून दिली. अनिल गावस यांनी सूत्रसंचालन केले. सावळो उसकईकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या