माडाची आळी काढण्यासाठी पावर टिलरचा वापर

UTTAM GONKAR
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

नारळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच माडाची देखरेख करण्यासाठी गोव्यातील पारंपरिक माडांना चार किंवा पाच वर्षात आळी काढण्याची प्रथा आहे.

सासष्टी

नारळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच माडाची देखरेख करण्यासाठी गोव्यातील पारंपरिक माडांना चार किंवा पाच वर्षात आळी काढण्याची प्रथा आहे. पण, सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे ही आळी काढण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असून मनुष्यबळाचा वापराने आळी काढण्यासाठी वेळ व पैसाही जास्त लागत असल्यामुळे कुंडई येथील युवा शेतकरी सौरभ कामत हा पॉवर टिलर या आधुनिक यंत्राचा वापर करून आळी काढत आहे. सौरभ याने स्वतःच्या बागायतीत पॉवर टिलरच्या सहाय्याने आळी काढली असून दुसऱ्याही बागायतदारांना टिलरच्या मदतीने आळी काढून देत आहे.
सौरभ कामत यांनी धारबांदोडा तालुक्यात २० हेक्टर जमिनीत इंदिरा फार्म या नावाने मोठी बागायत केली असून काजू, सुपारी, नारळ, मसाले आणि इल पाम आदी पीक सौरभ घेत आहे. जास्त कृषी उत्पन्न घेण्यासाठी यांत्रिक शेती हा उत्तम पर्याय असून कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. सौरभही आपल्या फार्ममध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करीत असून आता त्याने फार्ममध्ये असलेल्या चारशे माडांना पॉवर टिलरच्या साहाय्याने आळी काढलेली आहे. पॉवर टिलरच्या मदतीने आळी काढणे शक्य आहे हे सौरभने सिद्ध करून दाखविले असून धारबांदोडा तालुक्यात अनेकांना त्याने आळी काढून दिलेली आहे.
नारळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी माडाची देखरेख करणे आवश्यक असून माडाचे चांगले पीक येण्यासाठी चार किंवा पाच वर्षांनी माडांना आळी काढणे महत्त्वाचे आहे. एका माडाला मनुष्यबळाच्या मदतीने आळी काढण्यासाठी ४०० ते ५०० रुपये घेण्यात येतात. पण, आपण पॉवर टिलरच्या साहाय्याने आळी काढण्यासाठी एका माडाला जास्तीत जास्त १५० ते २०० रुपये खर्च येतो. पॉवर टिलरने पैसा तसेच वेळही कमी लागतो. कोरोनाच्या काळात सध्या कामगार मिळणेही शक्य नसून बागायतदार पॉवर टिलरचा वापर करून यशस्वीपणे आळी काढू शकतात. धारबांदोडा तालुक्यातील अनेकांना पॉवर टिलरच्या मदतीने आपण आळी काढून देण्यात आली असून बागायतदारांनी आपल्यास संपर्क साधल्यास आपण त्यांना आळी काढून देणार, असे सौरभ कामत यांनी सांगितले.
सौऱभ याने गेल्या नऊ वर्षापासून पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन शेतीत नावीन्य आणण्याचा सतत प्रयत्न केला आहे. सौरभ आपल्या फार्ममध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करीत असून घरी बसल्यास मोबाईलवरून सिंचन करण्याचे यंत्र त्याच्याजवळ आहे. हे यंत्र त्याने सांगली- महाराष्ट्र येथून आणले आहे. फार्ममधील पिकांची रानटी जनावरामुळे नुकसानी होऊ नये, यासाठी त्याने सौर ऊर्जेचे कुंपण घातलेले आहे. सौरभकडे शेतीमधील नवनवीन गोष्टी शिकण्याची जिद्द असून त्याच्यात सहनशीलता असल्यामुळे कृषी क्षेत्रात त्याला यश मिळाले आहे. शेती व्यवसायात मेहनत घेतल्यास निश्चितच यश मिळते. पण, शेतीत हुशारी दाखविल्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतो हे सौरभ यांनी सिध्द करून दाखविलेले आहे.
सौरभ हा ऑईल पामचे वर्षाला २० ते ९० टन, काजू १ टन, सुपारी ८ ते ९ क्विंटल, तर मिरीचे २०० ते ३५० किलो पीक घेत असून पाम ऑईलचे सर्वाधिक उत्पन्न घेण्यास सौरभ संपूर्ण धारबांदोडा तालुक्यात पहिल्या स्थानावर आहे. सौरभ पाम ऑईल गोदरेज कंपनीला देत असून सरकारकडे गोदरेज कंपनीचा करार असल्यामुळे सरकारकडून त्याला अनुदानही मिळत आहे. सौरभ यांनी सुरुवातीला शेतीत प्रवेश केला त्यावेळी आर्थिक समस्या त्याला भेडसावत होती. पण आता त्याची आर्थिक स्थिती बळकट झाली असून त्याच्या हाताखाली पाच कामगार काम करीत आहे. घाऊक व्यापाऱ्यांना बाजूला ठेवून थेट ग्राहकांना शेतमाल पुरविल्यास चांगला नफा होऊ शकतो यावर लक्ष्य केंद्रित करून सौरभ आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

EDITING _ SANJAY GHUGRETKAR

संबंधित बातम्या