मुरगाव पालिका कामगारांच्या वेतनासाठी भविष्य निर्वाह निधीचा वापर!

प्रतिनिधी
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांचे उद्या आंदोलन शक्य

मुरगाव:  ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला’असा व्यवहार करणाऱ्या मुरगाव पालिकेने आपल्या कामगारांचे निव्वळ वेतन देण्यासाठी भविष्य निर्वाह निधी वापरण्याचा विचार चालविला आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे कामगारांना एकूण वेतन वितरीत केले जाणार 
नाही.

मुरगाव पालिका कामगारांना ऑगस्ट महिन्याचे वेतन अद्याप वितरीत केले नाही. कामगार संघटनेने वेतन न दिल्यास गुरुवारी ३ सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. बुधवारी कोणत्याही परिस्थितीत कामगारांचे वेतन वितरीत करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ चालली आहे. त्यासाठी कामगारांचा भविष्य निर्वाह निधी वापरण्याचा विचार सुरू असल्याचे कळते. 

या निधीतील ६० लाख रुपये वापरून कामगारांना फक्त निव्वळ (नेट) वेतन देण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना एकूण (ग्रॉस) वेतन मिळणार नाही.

दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह ठरलेल्या आणि गेल्या दोन महिन्यांपासून सेवेत नसलेल्या एका कंत्राटी अधिकाऱ्याला दोन महिन्यांचे पूर्ण मानधन देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे कामगार वर्गात संताप पसरला आहे. उद्या (बुधवार) वेतन न मिळाल्यास गुरुवारी संपावर जाण्याचा कामगारांचा निर्णय पक्का असल्याचे कामगारांकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या