सोशल मीडियाचा वापर सत्कार्यासाठी

प्रतिनिधी
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

‘फ्री स्टफ गिव्ह अवे’ ग्रुपद्वारे गरजवंतांना मदत : आठ हजारजणांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग

पणजी: सोशल मीडियाचा वापर चांगला आणि वाईट असा दोन्ही प्रकारे करता येतो. अलीकडे सोशल मीडियामुळे आयुष्यात बदल झालेल्‍यांचीही नावे ऐकायला मिळतात. तशाच प्रकारे ‘फ्री स्टफ गिव्ह अवे’ नावाचा गोमंतकीय लोकांचा फेसबुक समूह कार्यरत झाला आहे. हा समूह जगातील कचरा कमी करण्याच्या आणि एकमेकांना सहाय्य करण्याच्या हेतू कार्यरत आहे. या समूहावर वापरात नसलेल्या वस्तू शेअर केल्या जातात आणि मग, ज्याला याची गरज आहे, त्या व्यक्तीला मोफत स्वरूपात दिल्या जातात.

काही दिवसांपूर्वी हा समूह अगदी लहान संख्येत कार्यरत होता. मात्र, आता या समूहात ८ हजारपेक्षा अधिक सहाय्‍यकारी लोक समाविष्‍ट झाले आहेत. येथे दररोज विविध वस्तू देण्यासाठीच्या पोस्ट शेअर केल्या जातात. 

ज्यांना या वस्तू हव्या असतात, ते लोक त्या पोस्टवर कमेंट करतात आणि जो पहिला कमेंट करेल त्या व्यक्तीला किंवा ज्यांना अधिक गरज आहे, त्या व्यक्तीला ती वस्तू दिली जाते.

या वस्तूमध्ये प्रामुख्याने पुस्तके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे आणि घरातील इतर वापराच्या वस्तूही दिल्या जातात. कोरोनामुळे आलेल्या जागतिक महामारीमुळे एका बाजूला नियती अनेक संकटे आणत आहे, मात्र काही चांगले लोक पुढे येत चांगले उपक्रमही राबवित असल्याचे यामुळे सिद्ध होत आहे.

 

संबंधित बातम्या