गोव्यातही पंचायत पातळीवर टीका महोत्सवाचे आयोजन

गोव्यातही पंचायत पातळीवर टीका महोत्सवाचे आयोजन
vaccination festival organized at Panchayat level in Goa

पणजी: कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी व्यापक चाचण्या घेण्याची आणि राज्यांनी 11 ते 14 एप्रिल दरम्यान लस महोत्सव आयोजित करण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यांना केली. देशाबरोबरच गोव्यातही 11 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान पंचायत पातळीवर टीका महोत्सव  अर्थात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली आहे. 

11 एप्रिल ला ज्योतिराव फुले यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त ‘टिका’ महोत्सव सुरू होईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजीच्या जयंतीपर्यंत लसीकरण महोत्सव चालणार आहे. 45 वर्षांवरील सर्व लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे काम या चार दिवसांमध्ये पंचायत पातळीवर होणार आहे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये जागा नसेल, तेथे जवळपास असलेल्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूणच देशातील कोरोना नियंत्रण मोहिमेचा आढावा घेतला व जगात अमेरिकेमागोमाग भारत हा दुसरा देश कोरोना नमुने तपासणीमध्ये आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यामध्ये असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केल्याचे मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी सांगितले. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये डॉक्टर, परिचारिका यांच्यासोबतच देशातील युवकांनी सहभाग घ्यावा, जनजागृती करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

9 एप्रिल रोजी लसीकरण महोत्सवांतर्गत कोविड प्रतिबंधक लसीकरण होणार आहे, याची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. लॉकडाऊन हा पर्याय सध्याच्या स्थितीत योग्‍य नाही. परीक्षांबाबत फेरविचार होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, आज राज्यात 3586 व्यक्तींनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला.
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com