देशात लशीचे होणार महा‘वितरण’, पंतप्रधान

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

कोरोना लशीचे वितरण करण्याची प्रणाली सार्वत्रिक निवडणुकीच्या धर्तीवर विकसित करण्यात यावी, या लशीचा सुरवातीचा लाभही समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या प्रतिनिधींना मिळाला पाहिजे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आढावा बैठकीत केली. या वेळी त्यांनी लसीच्या निर्मितीचाही आढावा घेतला.

 नवी दिल्ली : कोरोना लशीचे वितरण करण्याची प्रणाली सार्वत्रिक निवडणुकीच्या धर्तीवर विकसित करण्यात यावी, या लशीचा सुरवातीचा लाभही समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या प्रतिनिधींना मिळाला पाहिजे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आढावा बैठकीत केली. या वेळी त्यांनी लसीच्या निर्मितीचाही आढावा घेतला. भारतीय लस लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत, मात्र आरोग्य निकषांवर उतरणारी लस तयार करण्याबाबत दक्षता बाळगण्याची सूचनाही त्यांनी केली. 

देशात दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याकडे लक्ष वेधतानाच त्यांनी सामाजिक स्तरावर अत्यंत सावधगिरी बाळगण्याची सवय सोडणे परवडणारे नाही अशीही जाणीव करून दिली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात तीन कोरोना लशींनी चाचण्यांचे महत्त्वपूर्ण टप्पे ओलांडले आहेत. यातील दोन लसीच्या दुसऱ्या तर एका लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यास सुरवात झाली आहे.

कोरोनावरील प्रस्तावित भारतीय लस भारतीयांबरोबरच साऱ्या जगाला पुरविण्यासाठी आमच्या यंत्रणांनी प्रयत्न करावेत अशी सूचनाही त्यांनी केल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली. कोरोना विषाणू आनुवंशिक रूपाने भारतात स्थिर आहे. त्याच्यात फारसे परिवर्तन झाल्याचे मोठे उदाहरण देशात आढळलेले नाही, असेही सांगण्यात आले.  

काळजी घ्यावी लागणार आगामी सणासुदीच्या व हिवाळ्याच्या काळात कोरोनापासून विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क, सामाजिक अंतरभान व हात धुण्यासारख्या सवयींचे काटेकोर पालन करण्याबाबबतच्या जनजागृतीचा परीघ आणखी वाढवावा, असा सूचना पंतप्रधान  मोदी यांनी आज संबंधित यंत्रणांना दिल्या. मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही कोरोना आढावा बैठक पार पडली. पीएमओचे मुख्य सचिव, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, नीती आयोगाचे सदस्य व कोरोना विशेष कृती गटाचे सदस्य या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीस उपस्थित होते.

रशियन लशीच्या भारतात चाचण्या होणार

"कोरोनावरील रशियन बनावटीच्या ‘स्फुटनिक-५’ या लशीच्या भारतातील शेवटच्या टप्प्यातील चाचण्यांना हिरवा कंदील मिळाला आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि डॉ. रेड्डीज लॅब या दोन संस्थांना आता या लशीच्या क्लिनिकल ट्रायल घेता येतील. या आधी भारताने या लशीला मान्यता दिली होती पण नंतर मात्र नियामकांनी तिच्या पुरेशा चाचण्या झाल्या नसल्याचे सांगत त्यांना ब्रेक लावला होता. तसेच, या लशीच्या निर्मात्यांना आणखी चाचण्या घेण्याचे निर्देश दिले होते. आता या लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या होणार असून, त्यामध्ये दीड हजारजण सहभागी होतील."

संबंधित बातम्या