वाकीकुळण येथील शेतजमीन लागवडीखाली येणार

Dainik Gomantak
गुरुवार, 21 मे 2020

कुळण येथे सुमारे ४५ एकर शेतीची जमीन आहे. सुमारे ६५ शेतकरी येथे पावसाळी शेतीचे पीक घेत आहेत.

धारबांदोडा

कुळे शिगाव पंचायत क्षेत्रातील वाकीकुळण येथे पावसाळी शेती लागवडी संबंधी हल्लीच धारबांदोडा विभागीय कृषी अधिकारी नागेश कोमरपंत यांनी कुळण येथे किसान सभा वाकीकुळण या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.
कुळण येथे सुमारे ४५ एकर शेतीची जमीन आहे. सुमारे ६५ शेतकरी येथे पावसाळी शेतीचे पीक घेत आहेत. मात्र, गेल्यावर्षी येथील शेतकऱ्यांनी रानटी जनावरांच्या उपद्रव्याला कंटाळून शेती करणे सोडून दिले होते. यंदा शेतीला पावर फेन्सींग करण्यात आल्याने शेतकरी पुन्हा भातशेतीकडे वळावे यासाठी धारबांदोडा कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहे.
कृषी अधिकारी कोमरपंत यांनी किसान सभा वाकीकुळण या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी कोणत्या प्रकारची बियाणे व यंत्राद्वारे शेती लागवड करण्यासंबंधी चर्चा केली. त्यांच्यासोबत त्यांचे सहाय्यक किरण जोशी उपस्थित होते. भातशेती लागवडीसंबंधी अधिक माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी येत्या शनिवारी २३ मे रोजी
शिगाव येथे मोजक्‍याच शेतकऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांसाठी सरकार दरबारी असणाऱ्या योजनासंबंधी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे, असे कोमरपंत यांनी सांगितले. यावेळी किसानसभा संघटनेचे अध्यक्ष नरेश शिगांवकर उपाध्यक्ष उमेश नाईक, सचिव गोविंद शिगांवकर, खजिनदार अखिल वेळीप, सहसचिव सत्यवान खेडेकर व इतर शेतकरी उपस्थित होते.

संबंधित बातम्या