"मुख्यमंत्री प्रमोद सावंत जनतेला फक्त पोकळ आश्वासने देताय"

"मुख्यमंत्री प्रमोद सावंत जनतेला फक्त पोकळ आश्वासने देताय"
valmiki naik and pramod sawant.jpg

पणजी: घटक राज्य दिनानिमित्त केलेल्या घोषणा म्हणजे हेडलाईन मॅनेजमेंट आणि अपयश लपविण्यासाठी  करण्यात आलेले जुमले होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) जनतेला फसवण्यासाठी केवळ दिशाभूल करणाऱ्या घोषणा आणि पोकळ आश्वासने (Promises) देत आहेत, अशी टीका आम आदमी पक्षाने (AAP) केली आहे. (Valmiki Naik criticized Chief Minister Pramod Sawant for giving hollow promises to the people)

प्रवक्ते वाल्मिकी नाईक यांनी बुधवारी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, सावंत यांचा प्रसिद्धीसाठी घटक राज्य दिनानिमित्ताने केलेले संबोधन म्हणजे फक्त जुमलेबाजी होती. त्यामागे केवळ प्रसिद्धी मिळवणे आणि जनतेची दिशाभूल करण्याचा उद्देश होता. ‘आप’ने देशातील साथीच्या रोगाने ग्रस्त असलेल्या सर्व घटकांना, कोविड योद्धा असो, किंवा कोरोना योद्धा असो किंवा टाळेबंदीमुळे आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या सामान्य माणसाला सर्वसमावेशक आर्थिक दिलासा मिळावा यासाठी गोवा सरकारने दिल्ली मॉडेलप्रमाणे काम करण्याची मागणी केली होती. 

कोरोनामुळे घरातील कमावता सदस्य गमावलेल्या गरीब कुटुंबांना दोन लाख रुपयांची मदत देण्याबाबत नाईक म्हणाले की,  मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ‘काही दिवसांत’ कोणतीही अधिसूचना किंवा तपशील याबाबत दिलेला नाही. योजनेसंदर्भात उत्पन्नाची अट काय? बळी पडलेल्या कमावत्या सदस्याच्या उत्पन्नाची अट काय? तसेच सरकारने या योजनेसाठी एकूण किती पैसे मंजूर केले? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली नाहीत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेली रक्कम मयत झालेल्या प्रत्येक कोविड पीडितासाठी असून त्यात कोणत्याही अटी किंवा छुप्या शर्ती नाहीत.

अनाथ मुलांची गैरसंस्थात्मक काळजी घेण्याच्या योजनेत तथाकथित वाढ करण्याबाबत नाईक यांनी आरोप केला की, ही घोषणा पूर्णपणे खोटी गोष्ट आहे.  कोविडग्रस्त कुटुंबातील सर्व कुटुंबांना योग्य मोबदला मिळावा आणि अनाथ मुले व कुटुंबीयांना मासिक रोख लाभ मिळावा. रिक्षाचालक, टॅक्सी चालक इत्यादींना तसेच टाळेबंदीच्या निर्बंधामुळे पीडित छोट्या उद्योजकांना कोणतीही सवलत जाहीर केलेली नाही, असेही नाईक यांनी सांगितले.

दोन्ही योजनांचा तपशील जाहीर करा!
प्रवक्ते वाल्मिकी नाईक म्हणाले की, या योजनेची अद्याप कोणतेही अधिसूचना काढलेली नाही आणि 4 हजार रुपये तर नाहीच. पण 2 हजार रुपयेदेखील एकाही मुलाला आजवर मिळालेले नाहीत. या दोन घोषणांनी फक्त वर्तमानपत्रांत ठळक बातम्या  छापून आल्या. त्यातून लोकांना थोडासा दिलासा मिळेल, ही आशा होती. मात्र या घोषणा फक्त जुमलेबाजी होती हे स्पष्ट झाले आहे. दोन्ही योजनांसाठी वाटपाची एकूण आकडेवारी व तपशील जाहीर करावा. या योजनांसाठीच्या एकूण वाटपाची रक्कम सावंत यांनी कॅसिनोंच्या माफ केलेल्या कराच्या म्हणजे 277 कोटी रुपयांच्या 1 टक्कादेखील असणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com