Goa School: राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता मूल्‍यवर्धित शिक्षण सुरू करणार

मुख्यमंत्री : आलेक्‍स रेजिनाल्‍ड यांच्‍या प्रश्‍नाला उत्तर; मुलांना मिळणार नैतिक शिक्षणाचे धडे
Goa Schools
Goa Schools Dainik Gomantak

पणजी : शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण देण्यासाठी सरकारने आता भरभक्कम पावले उचलली आहेत. यासाठी शालेय शिक्षण संचालनालयाने मूल्‍यवर्धित शिक्षण लागू केले आहे. गोवा शिक्षण विकास एजन्‍सीच्‍या (Goa Eduvcation Development Agency) माध्यमातून सर्व सरकारी प्राथमिक शाळांमध्ये ही योजना लागू केल्‍याची माहिती शिक्षणमंत्री पदाचा कार्यभार सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी दिली.

नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभा अधिवेशनात आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड (Alex Reginald) यांनी यासंदर्भात अतारांकित प्रश्‍न उपस्‍थित केला होता. पुणे येथील मुथ्‍था फाउंडेशन (Muttha Foundation, Pune) ही संस्‍था हे काम पाहाते, अशी माहिती या उत्तरात देण्यात आली. शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि गोवा समग्र शिक्षा यांच्‍या वतीने राज्‍यातील शिक्षण पद्धतीचे निरीक्षण केले जात आहे. शालेय शिक्षणामध्ये नैतिक/मूल्य शिक्षणावर भर देण्यासाठी दोन टप्पे केले असून इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी असे हे दोन टप्पे आहेत. याचबरोबर शिक्षकांमध्येही याविषयी जागृती केली जात असून कालबद्ध पद्धतीने हे शिक्षण दिले जात असल्‍याचे या उत्तरात म्‍हटले आहे.

Goa Schools
गोव्यातील खाणपट्ट्यांचा लिलाव करावाच लागेल

महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण हा विशेष विषय किंवा अभ्यासक्रम म्हणून शिकवला जात नाही. पण महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजविण्यावर भर दिला जात आहे.

राज्‍यातील शाळांना समुपदेशक पुरविले असून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्रेही आयोजित केली जातात. शिक्षण खात्‍याच्‍या वतीने दहावी आणि पदवीच्‍या विद्यार्थ्यांना भविष्य काळातील जीवन सक्षम करण्यासाठी तसेच करिअरची निवड करण्यासाठी विशेष शिक्षण दिले जाते. सरकारी माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना स्‍वसंरक्षणाचेही धडे दिले जातात, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. याविषयी आमदार वेन्‍झी व्हिएगस (MLA Venzy Vegas) यांनी अतारांकित प्रश्‍न उपस्‍थित केला होता.

विद्यर्थ्यांसाठी समुपदेशन सत्रे

महाविद्यालयांमध्ये यासाठी व्‍याख्यानांचे आयोजन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, चारित्र्य आणि प्रामाणिकपणा निर्माण करण्यासाठी समुपदेशन सत्रे घेतली जातात. यासाठी महाविद्यालयांमध्ये मूल्‍य शिक्षण विभाग आणि समित्‍यांची स्‍थापना केली असून यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदशन केले जाते, असे मुख्यमंत्र्यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com