वास्कोत पोलिसांविरुद्ध नाराजीचा सूर

प्रतिनिधी
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

वाढीव वीज बिलांविरोधातील आंदोलनावेळी प्रतिकात्मक पुतळा गायब

मुरगाव: वाढीव वीज बिलांविरोधात काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झालेले वीज ग्राहक आंदोलन स्थळावरुन मागे हटले नाहीत, तर त्यांच्यावर भा. दं. सं. १८८ कलमाखाली गुन्हा नोंद करून अटक केली जाईल, असा इशारा  देणारे वास्कोचे पोलिस निरीक्षक निलेश राणे यांचा सर्व थरांतून निषेध केला जात आहे.

आम्ही लोकशाही आणि गांधीवादी मार्गाने वाढीव वीज बिलांविरोधात निषेध नोंदवत होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी निषेध करण्यासाठी वीज मंत्री निलेश काब्राल यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार केला होता. त्या पुतळ्याचे दहन करणार की नाही, हे स्पष्ट नसताना पोलिस उपनिरीक्षक डायगो रॉड्रिग्स यांनी तो पुतळा श्री. आमोणकर हे पत्रकारांना संबोधित करताना गुपचूपपणे नेला होता. त्यामुळे शांतताप्रिय आंदोलनाला तडा गेला होता. आंदोलनकर्ते हिंसक बनण्यापूर्वीच श्री. आमोणकर यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन करून माघारी परतण्याची विनंती केल्याने वास्कोतील विद्युत भवन परीसरात निर्माण झालेले तंग वातावरण निवळले होते. मात्र, पोलिस निरीक्षक निलेश राणे यांनी नाहक लोकांना अटक करण्याचा इशारा देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रकार घडविल्याने त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर उमटला आहे.

वाढीव वीज बिलांच्या विळख्यात सर्वचजण सापडले आहेत. सरकारने दोन महिन्यांचे वीज माफ करून लोकांना दिलासा द्यावा, यासाठी श्री. आमोणकर यांनी गांधीवादी मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. गेल्या महिन्याभरापासून चाललेल्या ह्या आंदोलनाला कुठेच बाधा आणली गेली नाही. शांततेत आंदोलन छेडले जात असल्याने पोलिसांनाही बंदोबस्तावेळी कसलाच त्रास झाला नाही. मात्र, वास्कोत पोलिस निरीक्षक निलेश राणे यांनी दादागिरी करून लोकांना उग्र होण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांचे डावपेच लगेच ओळखलेल्या संकल्प आमोणकर यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन करून माघारी परतण्यास सांगितल्याने अप्रिय घटना टळली होती.

संबंधित बातम्या