वास्को मार्केट प्रकल्प वादाच्या अडकित्त्यात

Vasco market project embroiled in controversy
Vasco market project embroiled in controversy

मुरगाव:  वास्कोतील नियोजित मासळी मार्केट प्रकल्पाची जागा कोणाची? आणि १४ व्या वित्त आयोगाचा निधी मार्केट प्रकल्पासाठी वापरण्याची मंजुरी आहे का? या दोन्ही प्रश्र्नांची उत्तरे पुराव्यासह मुरगाव पालिकेने मासळी विक्रेत्या महिलांना अगोदर द्यावी त्यानंतरच मासळी मार्केट बांधण्यासाठी सहकार्य करु असा पवित्रा वास्कोतील मासळी विक्रेत्या महिलांनी घेतल्याने पुन्हा एकदा मासळी मार्केट प्रकल्प वादाच्या अडकित्त्यात सापडला आहे.

वास्कोतील नियोजित मासळी मार्केट प्रकल्प उभारण्यास आडकाठी आणली जात असल्यास साम -दंड -भेद चा वापर करून मुरगाव पालिका आपले नियोजित लक्ष गाठण्यासाठी सर्व तयारीनिशी पुढारलेली आहे.आता हे अति झाले असाच सूर पालिका वर्तुळातून ऐकायला येत आहे.कोणत्याही परीस्थितीत मासळी मार्केट प्रकल्प साकार केलाच जाईल त्यासाठी पुढील आठवड्यात प्रकल्पाची पायाभरणी करण्यावर पालिकेने ठाम निर्णय घेतला आहे.


१४ व्या वित्त आयोगाचा मार्केट बांधकामासाठी आलेला निधीचा पुरावा दाखवा तसेच मासळी मार्केटची जागा मुरगाव पालिकेच्या ताब्यात असलेला पुरावा आमच्या हातात द्या नंतरच नवीन मासळी मार्केट बांधकामास हात घाला अशी ठाम भूमिका  मासळी विक्रेत्या महिलांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत घेतली.


  नवीन मासळी मार्केट बांधकामाचा तिढा सोडवण्यासाठी मासळी विक्रेत्यांची बैठक उपजिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आली होती. गेल्या आठवड्यात मासळी विक्रेत्यांनी मासळी मार्केटमध्ये स्वतः बैठक घेऊन जोपर्यंत मुरगाव पालिका लेखी हमी देत नाही तोपर्यंत मासळी मार्केट बांधकामास आमची परवानगी नसणार असा ठाम निर्णय घेतला होता. 


    दरम्यान आज शुक्रवारी घेण्यात आलेल्या बैठकीत उपजिल्हाधिकारी सचिन देसाई, नगराध्यक्ष नंदादीप राऊत, मुख्याधिकारी अरविंद बुगडे, नगरसेवक फॅड्रिक हेंन्रीक्स, पालिका अभियंता मनोज आर्सेकर, मासळी विक्रेत्या महिलांच्या नेत्या  कारीदात परेरा, फादर मायकल डिसोझा व इतर मासळी विक्रेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. सर्वप्रथम नगरसेवक फॅड्रिक हेंन्रीक्स यांनी मासळी विक्रेत्यांना मार्केटच्या जागेसंबंधी तसेच १४ व्या वित्त आयोगाच्या निधी संबंधी सविस्तर माहिती दिली व मार्केटचा मालकीहक्क पालिकेकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ही शंका दूर केली. यावर मासळी विक्रेत्या महिलांनी एकदाचे नवीन मासळी मार्केट बांधकाम हाती घेतल्यानंतर त्यावर कोणी स्थगिती आणली तर आम्ही रस्त्यावर पडणार तर नाही ना? असा प्रश्न केला तसेच नवीन बांधकामसाठी निधी खरंच उपलब्ध आहे  का असा प्रश्न उपस्थित केला. जोपर्यंत आमच्या शंकांचे निरसन   लेखी स्वरूपात पालिकेकडून केले जात  नाही तोपर्यंत नवीन मासळी मार्केट बांधकामाला सहकार्य केले जाणार नाही, आमच्या मनात या प्रकल्पाच्याबाबतीत साशंकता निर्माण झाली आहे असे मासळी विक्रेत्यांनी बैठकीत मतप्रदर्शन करुन "बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल"असा पवित्रा घेतला.


वास्कोत सुसज्ज नवीन मासळी मार्केट उभारावे ही सर्वांचीच इच्छा आहे.आम्हालाही हे मार्केट बेगोबेग बांधलेले पाहिजे पण, संशयाची पाल चुकचुकत असल्याने पालिकेने आमच्या मनातील संशय लेखी स्वरूपात दूर करावा अशी मागणी मासळी विक्रेत्या महिलांनी बैठकीत केली.


        दरम्यान नगरसेवक फेड्रिक हेंन्रीक्स यांनी याविषयी पुन्हा एकदा सविस्तर माहिती देऊन या मासळी विक्रेत्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता लेखी स्वरुपात शंका दूर करावी तसेच जागेचा मालक आणि निधी वापरण्याची मंजूरी हे दस्तावेज सादर करावे असा तगादा विक्रेत्यांनी धरल्याने बैठकीत कोणताच ठोस निर्णय झाला नाही. दरम्यान आजच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी मासळी विक्रेत्यांनी मासळी मार्केट बंद ठेवले होते. सर्व मासळी विक्रेत्या बैठकी दरम्यान उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com