वट पौर्णिमेला समाज अंतराची किनार

poornima
poornima

पणजी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण साधेपणाने साजरे केले जात आहेत. शुक्रवारी सुवासिनी महिलांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा वटपौर्णिमेचा सण राज्यात ठिकठिकाणी सामाजिक अंतर राखत व गर्दी टाळून साजरा करण्यात आला.

डिचोलीत वटपौर्णिमा
 पतिव्रतेचे माहात्म्य सांगणारी आणि सुवासिनींचा उत्साह व्दिगुणीत करणाऱ्या वटपौर्णिमे व्रत शुक्रवारी डिचोलीत सर्वत्र साजरे करण्यात आले. एरव्ही दरवर्षी वटपौर्णिमेच्या पारंपरिक वडाजवळ सुवासिनींची गर्दी उसळत होती. यंदा मात्र 'कोविड' महामारीमुळे वटपौर्णिमा व्रतातील निर्बंध आले होते. त्यामुळे या व्रतातील काही पारंपरिक रीतीरिवाजांना फाटा देत सामाजिक अंतराचे भान ठेवून सुवासिनींनी पारंपरिक वटवृक्षाची पुजा करून वडाभोवती सात फेरे मारीत हे व्रत साजरे केले. तालुक्‍यातील विविध ठिकाणी मिळून हजारो सुवासिनींनी वटवृक्षाचे पूजन केले.
पेडणे तालुक्यात सामाजिक अंतर ठेवून वटपौर्णिमा साजरी

पेडणे तालुक्यात वटवृक्षपुजन
 कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पेडणे तालुक्यात काही ठिकाणी सुवासिनींनी सामाजिक अंतर ठेवून वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून तर काही ठिकाणी वडाच्या फांद्या घरी आणून वटपौर्णिमा साजरी केली. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीमुळे दर वर्षीप्रमाणे भटजींनी येणे टाळले. गावातील महिलांनी वटवृक्ष अथवा घरात वडाच्या फांदीला सुत गुंडाळून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थना केली. या वटपौर्णिमेला बहुतांशपणे नववधूंचा समावेश होता.

मोरजीत वटपौर्णिमा
कोरोनाची धास्ती असली तरी पेडणे तालुक्यातील मोरजी परिसरात विविध भागात सुवासिनींनी वटपौर्णिमा साजरी केली कोविड-१९ च्या परिस्थितीवर सामाजिक अंतराचे पालन करताना महिलांनी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी न करता ती वैयक्तिक पातळीवर मर्यादितपणे घरच्या घरी साजरी करण्यास प्राधान्य दिले. वडाची पूजा करतानासुद्धा पुरोहिताच्या पूजा आग्रह धरला नाही किंवा वडाच्या झाडाला फेऱ्या घातल्या नाहीत मात्र, आपल्या घरातच वाड्यावर वटपौर्णिमा उत्साहात साजरी झाली.

साकोर्ड्यात वटपौर्णिमा उत्साहात
साकोर्डा परिसरातील मधलावाडा, सुर्ला आणि मळे या ठिकाणी वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी सुवासिनी सकाळपासून वडाच्या परिसरात सज्ज होत्या. मधलावाडा येथील शाळेच्या परिसरात असलेल्या वटवृक्षाच्या ठिकाणी वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी गावातील नववधू व सुवासिनींनी गर्दी केली होती. स्थानिक पुरोहित दिलीप भावे यांच्या उपस्थितीत विधिवत वटवृक्षपूजन करण्यात आले.

फोंडा तालुक्यात वटपौर्णिमा
फोंड्याच्या विविध भागात वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सुवासिनीकडून सकाळी वडाची पारंपरिक पध्दतीने पूजा केली. विशेषतः वटपौर्णिमेला नववधूंनी आपला सहभाग दाखविला. भारतीय संस्कृतीत वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन काळापासून ते आजही स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाची पूजा करताना पाहायला मिळतात. सुवासिनी वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालतात. पाच प्रकारच्या फळांचा नैवेद्य दाखविला जातो. काहींनी घरात वडाच्या फांद्या आणून पूजा करताना दिसल्या.

सत्तरीत वटपौर्णिमेचा उत्सव
सत्तरी तालुक्यात विविध गावात, वाळपई शहरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने वडाची पूजा करण्यास महिलांना अडचण झाली नाही. शुक्रवारी महिला वर्गांनी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले. सत्तरीत धावें गावात गेल्या अनेक वर्षापासून लोकांना प्राणवायू देत आले आहे. या वडाच्या झाडाची सुवासिनींनी आज पूजा केली. धावें तसेच नगरगाव, आंबेडे, वाळपई, ब्रम्हाकरमळी, बांबर आदी ठिकाणी वटपौर्णिमा करण्यात आली.


माशेल पंचक्रोशीत वटपौर्णिमा साजरी
 माशेल पंचक्रोशीत विविध मंदिर परिसरात यंदा वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. परंतु दरवर्षीप्रमाणे महिलांची गर्दी दिसली नाही. बऱ्याच महिलांनी घरातच वटपौर्णिमा साजरी केली. 'कोविड' महामारीमुळे वटपौर्णिमा उत्सवावर बरेच निर्बंध आले. त्यामुळे मोजक्याच महिलांनी वडाच्या झाडाकडे मास्कचा वापर करून, सामाजिक अंतर ठेवून विधी पूर्ण केल्या. खांडोळा येथील श्री सातेरी देवीच्या मंदिराजवळ, कुंभारजुवेत श्री माणागुरू वडेश्वर प्रसन्न ताकवाडा येथे मोजक्यात महिलांनी वटपौर्णिमा उत्सव साजरा केला. वडाची फांदी १५ व २० रुपयांना एक, वडाची पाने १०, ते २० रुपयांना२५ पाने, धागा गुंडी २०, ३० रुपये. फणस ५० ते २०० रुपये दर होता. अननस, आंब्याचे दरही दोन दिवसात वाढलेले होते.

दाबोळीत वटपौर्णिमा
कोरोना महामारी काळात काही सुवासिनींनी घरात तर काहींनी वडाकडे जाऊन पूजा केली. यावेळी तोंडावर मास्क व सामाजिक अंतराचे भान सुवासिनीने ठेवले असल्याचे दृष्टीपथास पडले. दरवर्षी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी वटपोर्णिमेदिवशी सुवासिनींची लगबग पाहावयास मिळत होती. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग असल्याने सुवासिनीवर पेच प्रसंग निर्माण झाला होता. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे वटपौर्णिमेच्या व्रतात कोरोनाची भीती कायम असल्याचे दिसून आले.

बोरीत वटवृक्षाची पूजा
बोरी शिरोडा गावातील सुवासिनीनी वटपौर्णिमा उत्सव जल्लोषात साजरा केला. टाळेबंदीच्या काळात बरेच उत्सव, धार्मिक कार्यक्रम साजरे केले गेले नाहीत. परंतु टाळेबंदी शिथिल केली गेल्यामुळे सुवासिनी नवीन वस्त्रालंकार, सुर्वणालंकार परिधान करून सुवासिक फुले माळून आज तोंडाला मास्क बांधून एकमेकांच्या घरी जाऊन वटपौर्णिमेचा आनंद लुटला. यानिमित्त सकाळी सुवासिनींनी गावातील वटवृक्षाची विधिवत पूजा करून आणि गंधफुले वाहून वटवृक्षाला धागा बांधून आणि पंचफळांचा नैवेद्य दाखवून वटवृक्षाची पूजा केली. काही सुवासिनीनी आपल्या घरात वटवृक्षाच्या फांद्या आणून पूजा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com