माशेलात भाजी, फळ बाजाराचे स्थलांतर

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

माशेल येथील भाजी बाजार बसस्थानक प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून भाजी, फळे, फुले विक्रेत्यांसाठी बाजारासाठी जागा हवी होती.

खांडोळा: माशेल येथील भाजी बाजार बसस्थानक प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून भाजी, फळे, फुले विक्रेत्यांसाठी बाजारासाठी जागा हवी होती. या प्रकल्पात विक्रेत्यांसाठी चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रशस्त जागेत हा प्रकल्प आहे. त्यामुळे विक्रेत्यांकडून उद्‍घाटनानंतर आनंद व्यक्त करण्यात आला. या बाजाराचे यावेळी मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच उन्नती नाईक, उपसरपंच जयेश नाईक, राजेंद्र नारकर, संकेत आमोणकर,  पाईक गावडे, मनमिता गावडे, सुशांत नाईक, सचिव सुशांत नाईक उपस्थित होते. मंत्री गावडे म्हणाले, माशेल पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी एकाच ठिकाणी फळ, भाजी, फुलांची खरेदी करता येईल. सुस्थितीत बाजार असून येथे सर्व सोयी आहेत. भविष्यात पंचायत मंडळातर्फे आणखी सुविधा पुरविण्यात येणार आहे. शिवाय सरकारचे विकासाचे धोरण आहे. त्यामुळे भविष्यातही ग्राम पातळीवर अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत.

पंचायत कार्यालयाचेही नव्या वास्तूत स्थलांतर करावे, कोणत्याही प्रकारचे भाडे सरकारतर्फे घेतले जाणार नाही. कारण उद्‍घाटनप्रसंगी सांगितल्याप्रमाणे कार्यवाही होणार आहे. पंचायत मंडळाने विकासासाठी एकत्र यावे. संपूर्ण प्रियोळ मतदारसंघात विकास कामे सुरू आहेत. काही काम कोरोनामुळे अर्धवट आहेत, ती लवकरच पूर्ण होतील, असेही गावडे म्हणाले.

उद्योजक राजेंद्र नारकर यांची जमीन गेली सातवर्षे भाजी मार्केटसाठी वापरण्यात आली. या सात वर्षांत त्यांच्याकडून आम्हाला पूर्ण सहकार्य मिळाले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले.

सरपंच उन्नती नाईक यांनी स्वागत केले. यावेळी ३० भाजी व इतर व्यावसायिकांनी आपला नव्या भाजी मार्केटमध्ये व्यवहाराला सुरुवात केली.

सूत्रसंचालन प्रेमानंद शिरोडकर यांनी केले. तर आभार उपसरपंच जयेश नाईक यांनी मानले.

संबंधित बातम्या