गोव्यातील कसिनोची वाहने ‘पार्किंग प्लाझा’मध्ये

Vehicles from the casino in Goa will be taken to the Multipurpose Parking Plaza
Vehicles from the casino in Goa will be taken to the Multipurpose Parking Plaza

पणजी:  गोव्याची राजधानी पणजी शहर हे जागतिक पर्यटन केंद्र आहे. त्यामुळे या शहरातील सर्व व्यवस्था सुरळीत असायला हवी. कारण इथं येणारे पर्यटक शहरातील व्यवस्था पाहूनच आपलं मत ठरवत असतात आणि ते पुन्हा पुन्हा येतात. त्यामुळे पणजीतील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी कसिनोत येणाऱ्या पर्यटकांची वाहने पाटो येथे बांधलेल्या बहुउद्देशीय पार्किंग प्लाझामध्ये नेण्यात येतील. त्याचबरोबर कसिनोंची कार्यालयेही मांडवी पुलाखालील जागेमध्ये  हलवण्याच्या महापालिकेच्या मागणीवर विचार केला जाईल, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

पणजी महापालिका क्षेत्रातील फेरीबोट धक्क्याजवळ नव्याने बसवलेल्या वाहतूक सिग्नलचे उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पणजी महापालिकेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर उदय मडकईकर, उपमहापौर वसंत आगशीकर, महापालिका आयुक्त संजित रॉड्रिगीस, नगरसेविका सोरय्या मखिजा पिंटो,  शेखर डेगवेकर, शिवम चोडणकर, दीक्षा माईनकर व वाहतूक संचालक राजन सातार्डेकर उपस्थित होते.

माविन गुदिन्हो पुढे म्हणाले, की वाहतूक सिग्नलमुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पणजी शहरातील बड्या हॉटेलनी त्यांची वाहने पार्किंग करण्यासाठी स्वतःची जागा उपलब्ध करायला हवी. पणजी शहरातील सिटी बसची वाहतूक कूर्मगतीने चालते. त्यामुळे मनात नसूनही अनेक वाहनचालक आपली वाहने घेऊन शहरात येतात. लोकांनी आपली वाहने बसस्थानकाजवळ ठेवून सिटी बसणे पणजीत यावे यासाठी सिटी बसेसचा वेग वाढवण्याबरोबरच जादा शटल बसेस उपलब्ध करण्याबाबत विचार केला जाईल.

कोलकाता येथील महा प्रसाद बिर्ला या कंपनीने पणजी शहरासाठी चार वाहतूक सिग्नल सामाजिक बांधिलकी (सीआरएस) अंतर्गत प्रदान केले आहेत. त्यातील दोन सिग्नल यापूर्वीच कला अकादमीसमोर व सांतिनेज येथे बसविण्यात आले असून तिसरा सिग्नल फेरीबोटीजवळ बसवण्यात आला आहे. एकाबाबत अद्याप जागा निश्चित केलेली नाही, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी यावेळी दिली. पणजीतील वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक सिग्नलची मोठी गरज आहे, असे सांगून पणजी शहरात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव सध्यातरी स्थगित ठेवण्यात आलेला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत जे कॅमेरे लावण्यात येणार होते ते फारच महाग असून येत्या स्मार्ट सिटीच्या बैठकीमध्ये गरज तिथेच सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याबाबत चर्चा होणार असल्याचेही मडकईकर यांनी सांगितले.

दरम्यान, पणजी मार्केटचे  थकलेले कोट्यवधी रुपयांचे वीज बिल महापालिकेने भरल्याचे महापौर मडकईकर यांनी सांगितले.  वीज खात्याच्या एक रक्कमी वीज बिल भरणा (ओटीएस)  योजनेचा लाभ घेऊन हे वीज भरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कसिनोची बुकिंग कार्यालये हळूहळू  इतरत्र नेण्यात येणार असल्याचे सांगून वाहतूक सिग्नल दिलेल्या महा प्रसाद बिर्ला या  कंपनीचे महापौरांनी यावेळी आभार मानले.

‘नव्या वाहतूक कायद्याची लवकरच अंमलबजावणी’
केंद्र सरकारने नवा वाहतूक कायदा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी गोव्यातही होणार आहे. मात्र, ही अंमलबजावणी करताना वाहनचालकांना कमीत कमी दंड देण्याबाबत वाहतूक खाते निर्णय घेणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी आज दिली.
या विषयावर मंत्रिमंडळ बैठकीतही चर्चा झालेली असून वाहनचालकांना दंडाचा मोठा फटका बसू नये याची दखल घेतली जाईल. राज्यातील वाहतुकीत शिस्त येण्यासाठी आणि अपघात कमी होण्यासाठी नव्या वाहतूक कायद्याची अंमलबजावणी गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. उबर टॅक्सीबाबतचा अंतिमनिर्णय अजून  झालेला नसून त्याबाबत अभ्यास सुरू असल्याचेही एका प्रश्नावर बोलताना माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com