वेर्ला-काणकाचे विद्यमान सरपंच मिल्टन मार्किस यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

गोमन्तक वृत्त्सेवा
शनिवार, 26 डिसेंबर 2020

वेर्ला-काणकाचे विद्यमान सरपंच,  बार्देश भागातील नामवंत उद्योजक मिल्टन मार्किस (वय ६१) यांचं काल गुरुवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

म्हापसा : वेर्ला-काणकाचे विद्यमान सरपंच,  बार्देश भागातील नामवंत उद्योजक मिल्टन मार्किस (वय ६१) यांचं काल गुरुवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक पुत्र व एक कन्या असा परिवार आहे. वेर्ला-काणका पंचायतीवर ते पाच कार्यकाळांसाठी पंचायतसदस्य म्हणून निवडून आले होते. त्या दरम्यान ते चार वेळा सरपंचपदी होते. तसेच, हणजूण जिल्हा पंचायतीचे सदस्य म्हणूनही त्यांची निवड झाली असता त्या वेळी त्यांची पत्नी सरपंचपदावर होत्या. गेल्या सुमारे तीस वर्षांपासून ते सक्रिय राजकारणात होते.

या पूर्वी त्यांनी शिवोली विधानसभेची निवडणूक दोन वेळा लढवली होती. तथापि, त्यात त्यांना यश मिळाले नव्हते. हॉटेल व्यवसायिक या नात्याने ते बार्देश तालुक्यात सर्वपरिचित होते. माजी समाजकल्याण मंत्री ॲड. चंद्रकांत चोडणकर व माजी जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांना आमदारपदी निवडून आणण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. आठ दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा झाल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी घरी जाऊ देण्यात आले होते; तथापि, पुन्हा स्वास्थ्य बिघडल्याने त्यांना ‘गोमेकॉ’त पुन्हा दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असतानाच आज गुरुवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांचे काही नातेवाईक विदेशात असल्याने त्यांच्यावरील अन्त्यसंस्कार नेमके कधी होतील याविषयीची माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.

संबंधित बातम्या