वेर्णा - सडा चौपदरी महामार्गाची गरज

Baburao Rivankar
शुक्रवार, 24 जुलै 2020

वेर्णा ते सडापर्यंतच्या १४ किलोमीटर लांबीचा मुरगाव बंदराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा चौपदरी महामार्ग निधी अभावी अपूर्णावस्थेत असून हा महामार्ग बांधून पूर्ण करणे गरजेचे आहे, पण कोणीच याकडे लक्ष देत नसल्याने गेल्या वर्षभरापासून महामार्गाचे काम अडले आहे.

मुरगाव
वेर्णा ते वरुणापुरी - मांगोरहिलपर्यंतच्या चौपदरी महामार्गाचे काम संरक्षण विभागाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) या आस्थापनाने पंधरा वर्षांपूर्वी पूर्ण केले. मात्र, त्यानंतर वरुणापुरी ते सडापर्यंतच्या पाच किलोमीटर अंतरावरील काम स्थगित ठेवण्यात आले. या महामार्गाच्या वाटेवर बायणा, देस्तेरोवाडा, सडा या भागातील काही घरे येत होती .ती हटविल्यानंतरच स्थगित झालेले काम पुढे चालू करणे शक्य होते, पण राजकारण्यांनी घरे वाचवावी यासाठी राजकारण खेळून महामार्गाचे काम दहा वर्षे रोखून धरले. तथापि, पाच वर्षांपूर्वी वरुणापुरी - बायणा ते तारीवाडापर्यंत उड्डाण पूल बांधून महामार्गाचे शिल्लक काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. त्यावर सुमारे ४५० कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा करून कामाचे कंत्राट पूल उभारण्याच्या कामात अग्रेसर असलेल्या गॅमन इंडिया कंपनीला देण्यात आले. या कामाचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. अवघ्या तीन वर्षांत उड्डाणपूल आणि महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार होते, पण काम सुरू होऊन आता पाच वर्षे उलटली तरी महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने काम रोखल्याचे कंत्राटदार कंपनीकडून सांगण्यात येते.
दरम्यान, चौपदरी महामार्ग बांधून पूर्ण झाल्यास अनेक समस्या दूर होणार आहेत. मुरगाव बंदराकडे जाणारी अवजड वाहने सध्या वास्को शहरांतून मार्गक्रमण करीत आहेत. ती या महामार्गावरून जाणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होईल, अवजड वाहनांमुळे होणारे अपघातही टळतील, पण याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने चौपदरी महामार्ग अपूर्णावस्थेत राहिला आहे. सरकारने निधी पुरवून महामार्गाचे शिल्लक असलेले काम पूर्ण करावे, अशी मागणी जनतेची आहे.

सरकारने त्वरित उपाययोजना करण्याची गरज
सद्यस्थितीत मुरगाव बंदरातून रस्तामार्गे मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक होत आहे. विविध वस्तूंची आयात निर्यात करणारे कंटेनर ये जा करतात. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर ताण येतो. याची दखल घेऊन चौपदरी महामार्ग वास्कोसाठी अत्यंत गरजेचा आहे हे जाणून सरकारने त्वरित उपाययोजना करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या