आशालताताईंनी गोव्याशी असलेली नाळ तुटू दिली नाही
आशालताताईंनी गोव्याशी असलेली नाळ तुटू दिली नाही

आशालताताईंनी गोव्याशी असलेली नाळ तुटू दिली नाही

पणजी: ज्या गोमंतभूमीने विविध कला क्षेत्रात थोर कलाकार दिले त्या कलाकारांच्या परंपरेतील, रंगभूमी, सिनेसृष्टी व दूरदर्शन मालिका या तिन्ही माध्यमांवर आपल्या सोज्वळ, सहजसुंदर अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री आशालता आशालताताईंना आपली जन्मभूमी गोवा याबद्दल अपार प्रेम, आत्मियता व अभिमान होता. त्या चित्रपटांच्या चित्रीकरणात कितीही व्यस्त असल्या तरी गोव्यात आल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. त्या कितीही मोठ्या झाल्या, मोठं मोठे मान, सन्मान त्यांनी प्राप्त केले तरी गोव्यात आल्यावर ज्या विनयशीलतेने त्या वागायच्या ते बघितल्यावर ऊर अभिमानाने भरून यायचे. त्यांचा सात्विक सुंदर अभिनय म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचेच प्रतिबिंब होते. गोव्यात आल्यावर आपल्या आप्तेष्टांना, मित्रमंडळीला, हितचिंतकाना त्या आवर्जून भेटायच्या. मुंबईवरून फोनवर कुशल क्षेम विचारायच्या. त्या कधीच आपल्या कोषात बंदिस्त राहिल्या नाहीत. मत्सर, असूया हे विकार तर त्यांच्या मनाला दुरुनही शिवले नाहीत. शशिकांत नार्वेकर अध्यक्षपदी असताना आशालताताईंना मानद अधिसदस्यत्व देऊन त्यांचा गोवा मराठी अकादमीतर्फे गौरव करण्यात आला होता. त्यांचा सहवास लाभलेले गोमंतकीय मान्यवर कलाकार तर ताईंच्या निधनाने हळहळले हे त्यांनी व्यक्त केलेल्या भावनामधून जाणवले.

गोवा मराठी चित्रपट महोत्सवात आशालताताईंना कृतज्ञता पुरस्कार आम्ही दिला होता. त्यावेळी त्यांचा सहवास लाभला. त्यांचा साधेपणा, सहकार्यशील स्वभाव, विनयशीलवृत्ती यामुळे आम्ही त्यांच्या अधिक जवळ पोचू शकलो. गोव्याबद्दल त्यांना कमालीची आत्मियता, अभिमान, आपुलकी होती. गोव्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी होती. किंबहुना काही करू शकले नाही ही खंत होती. ‘काहीही गरज पडली तर  हाक द्या’, असे सांगायच्या. कधीही फोन केला तर माझ्या गोव्याहून फोन आलाय या भावनेने फोन घ्यायच्या. 
- संजय शेट्ये

गोव्याच्या दौऱ्यावर असताना आशालताताईंचे मी ‘मत्स्यगंधा’ बघितले. त्यानंतर त्यांच्या अनेक भूमिका बघण्याची संधी लाभली. त्यांना भूमिकेची पूर्ण समज आणि उमज असायची. प्रेक्षकांसमोर परिपूर्ण भूमिका साकारण्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी असायची. त्यांनी शॉर्टकट कधी वापरला नाही. प्रेक्षकांना गृहीत कधी धरलं नाही. त्यांना अनेक  सन्मान लाभले. पण, त्याबद्दल कधीच त्या बोलत नव्हत्या. कारण त्यांना त्यांच्या मोठेपणाबद्दल बोलायला ऐकायला आवडत नसे.
- डॉ. अजय वैद्य

आशालताताई आशातऱ्हेने आकस्मिक गेल्याचे ऐकून धक्काच बसला. त्या एक अभिनेत्री म्हणून महान होत्या तेवढ्याच माणूस म्हणून मोठ्या होत्या. माझ्या ‘आलिशा’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. त्या आमच्या फॅमिली फ्रेंड होत्या. आमच्याकडे यायच्या, रहायच्या, फोनवर क्षेम कुशल विचारायच्या. त्या व सुलभा आर्या या माझ्या दोन आईच होत्या. आशालताताईंबरोबर हल्लीच माझा फोन झाला होता. त्या आणि रीमा लागू नेहमी फोन करायच्या. त्यांचे जाणे चटका लावून गेले. घरातले माणूस गेल्याचे दुःख झाले आहे.
- राजेंद्र तालक

गोवा हिंदू असोसिएशनच्या सं. ‘संशय कल्लोळ’ नाटकात १९५७ साली आशालता यांनी प्रथम अभिनय केला. १९६० मध्ये ‘मरणात खरोखर जग जगते’ हे नाटक बसवलं होतं त्यात ती माझी नायिका होती. ‘मत्स्यगंधा’ नाटकामुळे मात्र ती गाजली. दूरदर्शनवर रघुवीर नेवरेकर यांनी बसवलेल्या कोकणी नाटकातील तिचा अभिनय बासू चटर्जी यांनी बघितला आणि तिला हिंदी चित्रपटात भूमिका मिळाली मग मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. आशालता गुणी, अभ्यासू या ही अभिनेत्री होती. मन लावून काम करायची. देखणं व्यक्तिमत्व होतं. मास्टर दत्ताराम यांच्याबरोबर पाहिलं नाटकात काम करणे ही साधी गोष्ट नव्हती. सहा दशकांचा आमचा सहवास होता.
- मोहनदास सुखठणकर

आशालता यांच्याबरोबर माझ्या फारशा भूमिका झाल्या नाहीत पण त्या उत्तम अभिनय करायच्या. त्याबाबतीत त्या खरोखरच अत्यंत प्रामाणिक होत्या. त्यांचा आवाज सुंदर होता.त्यांनी गाण्याची तालीम घेतली असती तर गायिका म्हणूनही त्या पुढे आल्या असत्या. ‘मत्स्यगंधा’ नाटकामुळे त्या पुढे आल्या. मी मुंबईला राहत होतो, तेव्हा आमच्या बिल्डिंगमध्ये आशालता यांना फ्लॅट मिळवून दिला होता. त्यांच्याशी आमचे चांगले संबंध होते.गोपीनाथ सावकार यांच्या दिग्दर्शनाचा पुढील आयुष्यात त्यांना फायदा झाला. आज एका चांगल्या अभिनेत्रीला आम्ही मुकलो आहोत.
- पंडित प्रसाद सावकार
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com