व्होडाफोन-आयडियाच्या नेटवर्कला नेमकं काय होतंय?

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

डाफोन - आयडिया (व्हीआय) या मोबाईल नेटवर्क सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या ग्राहकांना सध्या नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. चार दिवसांपूर्वी या कंपनीच्या नेटवर्कच्या सुविधेत बिघाड झाला होता. गोव्यातच नव्हे, तर अनेक राज्यात त्यांच्या ग्राहकांना या खंडित सेवेचा फटका बसला.

पणजी :  व्होडाफोन - आयडिया (व्हीआय) या मोबाईल नेटवर्क सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या ग्राहकांना सध्या नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. चार दिवसांपूर्वी या कंपनीच्या नेटवर्कच्या सुविधेत बिघाड झाला होता. गोव्यातच नव्हे, तर अनेक राज्यात त्यांच्या ग्राहकांना या खंडित सेवेचा फटका बसला.

आजही गोव्यात या सेवेचे तीन-तेरा वाजल्याचे दिसून आले. सायंकाळपर्यंत या कंपनीची सेवा सुरळीत न झाल्याने कंपनीने एका संदेशामार्फत ग्राहकांकडे क्षमायाचना केली आहे. 
सध्या राज्यात ऑनलाईन शिक्षण किंवा काही कंपन्यांचे कर्मचारी घरूनच काम करतात. या कामांसाठी इंटरनेट सेवा महत्त्वाची आहे.

सध्या १०० पैकी ९० टक्के काम मोबाईलद्वारेच होते. त्यामुळे व्हीआय या कंपनीची इंटरनेट व फोन करण्यासाठी सेवा घेणाऱ्या ग्राहकांना एकाच आठवड्यात दोनवेळा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. गोव्यासारख्या ठिकाणी या कंपनीचे लाखो ग्राहक आहेत. त्यातच शालेय शिक्षण ऑनलाईन झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे क्लासेस सकाळच्या सत्रात घेतले जातात. 

आज पहाटेपासूनच ‘व्हीआय’ची नेटवर्क सेवा बंद झाल्याने मुलांबरोबर पालकांनाही त्रास सहन करावा लागला आहे. चार दिवसांपूर्वी व्हीआयच्या सेवेत व्यत्यय आल्याचे समजल्याने अनेकांनी मोबाईल क्रमांक पोर्टेबल करून इतर कंपन्यांची सेवा घेण्यास सुरवात केली असल्याचे नेटवर्क सेवा देणाऱ्या एका खासगी कंपनीच्या कार्यालय व्यवस्थापकाने सांगितले. एकाच आठवड्यात दोनवेळा नेटवर्क गायब होण्याच्या या प्रकारामुळे ही कंपनीची सेवा घेणाऱ्यांनी पुन्हा एकदा कंपनीच्या कार्यालयात नेटवर्क सेवेविषयी विचारणा केली. अनेकांनी याप्रसंगी नाराजीही व्यक्त केली.

संबंधित बातम्या