"लोकप्रतिनिधीची नाळ जनतेशी जोडली गेली पाहिजे"

 Vice President Venkaiah Naidu Legislative Day celebrations at Assembly complex
Vice President Venkaiah Naidu Legislative Day celebrations at Assembly complex

पणजी : गेल्या ५७ वर्षात गोव्याने ३० सरकारे पाहिली. ६ दिवसांचे सरकार ते ३३४ दिवसांचे सरकार येथे होते. केवळ तीन सरकारांनी पूर्ण कालावधी पूर्ण केला. पाच वेळा राष्‍ट्रपती राजवट अनुभवली. ती ६३९ दिवस म्हणजे दोन वर्षांइतकी होती. एवढी राजकीय अस्थिरता असून गोव्याने प्रगती केली. राजकीय स्थैर्य असते तर किती प्रगती झाली असती, याविषयी सर्व गोमंतकीयांनी आत्मपरीक्षण करावे, अशा बोचऱ्या शब्‍दांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गोमंतकीयांच्या सद्सद् विवेकबुद्धीला साद घातली. ते पर्वरी येथे विधानसभा संकुल परिसरात आयोजित विधिकार दिन सोहळ्यात बोलत होते.

यावेळी मंचावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व विधानसभा कामकाजमंत्री माविन गुदिन्हो होते. उपराष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या तीन विधानसभेतील सदस्य गजानन रायकर, रोहिदास नाईक, एदुआर्द फालेरो, चंद्रकांत चोडणकर व अनिल प्रभुदेसाई यांना गौरवण्यात आले. आमदार प्रतापसिंह राणे, माजीमंत्री गोपाळराव मयेकर, माजी आमदार तिओतिन परेरा या समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत. उपराष्ट्रपतींना गोव्याचा पारंपरिक ‘लामणदिवा’ या समारंभात भेट देण्यात आला.

गोवा प्रगतीपथावर
उपराष्ट्रपती म्हणाले, येत्या आठवड्यात साजऱ्या होणाऱ्या मकरसंक्रांत व पोंगलच्या सर्वांना शुभेच्छा. गोवा हे छोटे राज्य असले तरी निसर्गाने राज्याला भरभरून दिले आहे. येथील जनतेने, सरकारांनी मेहनतीने राज्याचा विकास केला आहे, त्यामुळे हे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. गेले वर्ष कोरोनाने गिळंकृत केले. त्या कटू स्मृती मागे टाकत आपणा सर्वांना पुढे गेले पाहिजे. गोव्याला साडेचारशे वर्षाच्या विदेशी जुलमी राजवटीचा इतिहास आहे. त्या तुलनेत भारतात ब्रिटिशांची राजवट दीडशे वर्षच होती. गोमंतकीय जनता साऱ्याला पुरून उरली. त्यांनी आपले अस्तित्व टिकवले. गोवा भारताला जोडण्यासाठी तत्कालीन सरकारने राजनैतिक प्रयत्न केले, पण यश आले नाही. गोव्याच्या मुक्तीने देशाचे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने पुरे झाले.

सभागृहात सकस चर्चा व्हावी
उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणांत आदर्श घेण्यासारखे नेते म्हणून नाथ पै, मधु दंडवते आदींचा उल्लेख केला. ते म्हणाले, लोकप्रतिनिधींनी विधिमंडळाच्या ग्रंथालयाचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे. पूर्वीच्या चर्चा अभ्यासल्या पाहिजेत. त्यातूनच प्रगल्भता येणार आहे. त्यांनी केवळ वर्तमानपत्रातील हेडलाईन्सचा विचार करून चर्चा करून नये, तर सकस चर्चा करावी. चांगल्या संवादकाला जनतेकडूनही तसाच प्रतिसाद मिळतो हे लक्षात ठेवावे. हे सारे जनतेच्या आनंदाचा निर्देशांक उंचावण्यासाठी आहे हे मनात ठेऊनच वावरावे.
सभापती राजेश पाटणेकर यांनी स्वागत केले तर उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी आभार मानले. डॉ. दयानंद राव यांनी सूत्रसंचालन केले. कला अकादमीच्या पथकाने सादर केलेल्या ‘सुंदर माझा गोवा’ या मराठी गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली.

नवनिर्माणाचे आव्हान पेलावे
बहुतांश गोव्याचे आता नागरीकरण झाले आहे. मनुष्यबळाचा विकास झाला आहे. देशात सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणारे असे हे राज्य आहे. मात्र गोव्यासमोर आव्हानेही तेवढीच आहेत. एका बाजूला समुद्र असल्याने सीआरझेडच्या मर्यादा आहेत. डोंगराळ भाग बऱ्यापैकी असल्याने विकासाला मर्यादा आहेत. जमीन हवी तेवढी उपलब्ध नसणे हीसुद्धा एक मर्यादा मानली पाहिजे. खाणकाम एका परमोच्च बिंदूपाशी येथून स्थिरावले आहे. यातून मार्ग काढण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर आली आहे. गोव्याच्या नवनिर्माणाचे हे आव्हान त्यांनाच पेलावे लागणार आहे, कारण जनतेनेच त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. हे सारे करण्यासाठी जनतेचा विश्वास हा महत्त्वाचा आहे. 

आत्मिक विकासही हवा
लोकप्रतिनिधींनी आपण सार्वजनिक जीवनात लोकांची सेवा करण्यासाठी आलो हे आधी लक्षात ठेवले पाहिजे. जगातील सर्वात सशक्त लोकशाही आपल्या देशात आहे. त्या लोकशाहीनेच लोकप्रतिनिधींना अधिक जबाबदार बनवले आहे. जनतेच्या विश्वासास लोकप्रतिनिधी पात्र ठरला की विकासाचे घोडे अडत नाही. लोकांचे जीवन आनंददायी, अर्थपूर्ण बनवणे हे लोकप्रतिनिधीच्या हाती असते. विकासाचे एक परिमाण हे आनंदाचा निर्देशांक आहे हे विसरले जाऊ नये, भौतिक विकासासोबत आत्मिक विकासही साधला गेला पाहिजे, असेही उपराष्ट्रपतींनी नमूद केले.

...नाळ जोडली पाहिजे!
लोकप्रतिनिधीची नाळ जनतेशी जोडली गेलेली असली पाहिजे, असे नमूद करून उपराष्ट्रपती व्यंकयया नायडू म्हणाले, सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीचे चारित्र्य उत्तम असले पाहिजे. ते नसेल तर पैसा, जातीयवाद आणि गुन्हेगारीकरण साऱ्या समाजकार्याचा बट्ट्याबोळ करतात. लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यात दरी असू नये.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com