उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू येणार गोव्यात: पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठक सुरू

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 7 जानेवारी 2021

गोवा विधानसभेच्या शनिवारी होणाऱ्या विधिकार दिनाच्या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित राहणार आहेत.

पणजी: गोवा विधानसभेच्या शनिवारी होणाऱ्या विधिकार दिनाच्या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित राहणार आहेत. विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी ही माहिती दिली. त्याच्या पार्श्‍वभूमीवर पर्वरी येथील सचिवालयात पोलिस अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. त्यांच्या कार्यक्रमांच्यावेळी वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेचा आराखडा तसेच त्याचा आढावा घेण्यात येत आहे.

त्यानी सांगितले उपराष्ट्रपती १० दिवस गोव्यात असतील. शनिवारी विधानसभा संकुलाच्या मागील बाजूच्या हिरवळीवर मोजक्या तिनशे जणांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या विधानसभेच्या हयात सदस्यांना यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता सुरू होणारा हा सोहळा दोन तास चालणार आहे.

या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, विधानसभा कामकाज मंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, विधिकार मंचाचे सचिव मोहन आमशेकर सहभागी होतील.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे ९ जानेवारीला गोवा विधानसभा विधीकार दिनाच्या सोहळ्याला गोव्यात येत आहेत. हल्लीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे गोवा मुक्तिदिनाच्या हिरक महोत्सव सोहळ्याला येऊन गेले. त्यावेळी काही रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने पणजी व आजुबाजूच्या परिसरात वाहन चालकांना वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले होते.

संबंधित बातम्या