माजी आरोग्‍यमंत्री कोरोनाचे बळी

amonkar
amonkar

डिचोली :

कोरोनाची संसर्गाची लागण झालेले माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश कुसो आमोणकर (६८ वर्षे) यांनी अखेर आज (सोमवारी) मडगावच्या ‘कोविड’ इस्पितळात जगाचा अखेरचा निरोप घेतला. डॉ. आमोणकर यांच्या रुपाने कोरोना संसर्गाने राज्यात आठवा बळी घेतला आहे. पेशाने डॉक्‍टर असलेल्या डॉ. आमोणकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्षपद, आमदार ते मंत्री अशी मजल मारली होती.

कोरोना संसर्गाची लागण झाल्याने आठ दिवसांपूर्वी डॉ. आमोणकर यांना मडगावच्या ‘कोविड’ इस्पितळात दाखल केले होते. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृत्ती नाजूक होती. मध्यंतरी उपचार चालू असताना त्यांचे निधन झाल्याचे वृत्तही समाज माध्यमावरून पसरले होते. मात्र, अखेर त्यांनी आज सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. डॉ. आमोणकर यांच्या मागे पत्नी, एक विविहित मिळून दोन कन्या असा परिवार आहे. साखळी परिसरातील एक प्रसिद्ध डॉक्‍टर म्हणून परिचित असलेले डॉ. सुरेश आमोणकर हे शांत आणि कमी बोलणारे असे व्यक्तिमत्व होते. त्‍यांच्‍या निधनामुळे राजकीय क्षेत्राबरोबरच साखळी मतदारसंघात हळहळ व्यक्‍त होत आहे. डॉ. सुरेश आमोणकर सध्या देसाईनगर-साखळी येथे स्थायिक झाले होते.
डिचोली तालुक्‍यातील आमोणे गावचे सुपूत्र असलेल्या डॉ. सुरेश आमोणकर यांचा जन्म १५ मे १९५२ साली झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंभारजुवे येथे झाले होते. वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी वेळगे आणि पाळी येथे दवाखाने सुरू करून त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा सुरू केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याने ते संघाच्या विचारसरणीचे होते. त्यातूनच त्यांचा भाजपशी संबंध आला आणि त्यांनी मग राजकारणात प्रवेश करून भाजपचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षकार्याकडे झोकून दिले.

मोठी उपलब्धी !
आमदार आणि मंत्रिपदी असताना त्यांनी मतदारसंघाच्या विकासकामांना चालना दिली. त्यांनी मतदारसंघात अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत. गोवा मुक्‍तीपासून प्रतीक्षेत असलेल्या आमोणा-खांडोळा पूल या महत्वांकाक्षी प्रकल्पाचे स्वप्न पूर्णत्वास येण्यामागचे श्रेय डॉ. सुरेश आमोणकर यांना जाते. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी हा पूल बांधण्याचे स्वप्न बाळगून पूल व्हावा. यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. आमदारकीच्या कारकिर्दीतील त्यांच्यासाठी ही एक मोठी उपलब्धी होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

डॉ. आमोणकर यांचा राजकीय प्रवास
१९९४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्या निवडणुकीवेळी राज्यात भाजप आणि मगोची युती होती. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीवेळी तेव्हाच्या पाळी मतदारसंघातून (सध्याचा साखळी मतदारसंघ) भाजपचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, पाळी मतदारसंघ युतीच्या मगोसाठी सोडण्यात आल्याने त्यातच ते स्व:त प्रदेशाध्यक्ष असल्याने शेवटच्याक्षणी त्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा पोटात ठेवावी लागली. १९९९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर ते पाळी मतदारसंघातून प्रथम निवडून आले. नंतर २००२ साली झालेल्या सलग दुसऱ्या निवडणुकीतही ते पाळी मतदारसंघातून विजयी झाले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम फ्रान्‍सिस सार्दिन यांच्या सरकारात, तर नंतर २००२ साली राज्यात प्रथमच सत्तेवर आलेल्या मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारात त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यांनी आरोग्य, समाज कल्याण, कामगार, कारखाने आणि बाष्पक खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. २००७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना काँग्रेसचे गुरुदास गावस यांच्याकडून हार पत्करावी लागली. नंतर दोन वर्षांनी तत्कालीन काँग्रेसचे आमदार गुरुदास गावस यांचे निधन झाल्याने २००९ साली या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यावेळी भाजपने डॉ. सुरेश आमोणकर यांना उमेदवारी नाकारून डॉ. प्रमोद सावंत यांच्या रुपाने युवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरविला. मात्र, त्या पोटनिवडणुकीत डॉ. आमोणकर यांच्यासह भाजपचे डॉ. प्रमोद सावंत यांना पराभव पत्करावा लागला. त्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्रताप गावस हे निवडून आले. नंतर २०१२ साली डॉ. आमोणकर यांनी अपक्ष म्हणून, तर मागील २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत साखळी विधानसभा निवडणुकीत गोवा सुरक्षा मंचाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली. या दोन्ही निवडणुकीत विजयी होण्याची किमया ते साध्य करू शकले नाहीत. मागील विधानसभा निवडणुकीनंतर मात्र आरोग्याच्या कारणामुळे ते राजकारणापासून काहीसे अलिप्त होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com