तेजपालविरुद्धच्या सुनावणीत पीडितेची न्यायालयास विनंती

प्रतिनिधी
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

बलात्कारप्रकरणातील संशयित तरुण तेजपाल याच्याविरुद्धच्या खटल्यावरील सुनावणीवेळी व्यक्तिशः उपस्थित राहणे शक्य नसल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उलटतपासणी घेण्यात यावी, अशी विनंती पीडित तरुणीने केली आहे.

पणजी: बलात्कारप्रकरणातील संशयित तरुण तेजपाल याच्याविरुद्धच्या खटल्यावरील सुनावणीवेळी व्यक्तिशः उपस्थित राहणे शक्य नसल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उलटतपासणी घेण्यात यावी, अशी विनंती पीडित तरुणीने केली आहे. त्यामुळे न्यायालयाने तिला जारी केलेले अंतरिम जामीनपात्र वॉरंट मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तूर्त स्थगित ठेवले आहे.

म्हापसा येथील न्यायालयात तरुण तेजपाल याच्याविरुद्धचा खटला गेल्या २ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. या खटल्यावरील सुनावणी लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे पीडित तरुणीला उलटतपासणीला उपस्थित राहण्याची नोटीस दिली होती तरी ती उपस्थित राहिली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने तिला जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. कोविड महामारीमुळे तिला गोव्यात येणे अशक्य असल्याचे तिने न्यायालयास सांगितले आङे. तिने न्यायालयाकडे केलेल्या अर्जावरील निर्णय प्रलंबित आहे.

या प्रकरणाला आठ वर्षे उलटून गेली तरी अजून खटल्यावरील सुनावणी प्राथमिक टप्प्यातच आहे. पीडित तरुणीने न्यायालयात जबानी दिल्यानंतर तिची उलटतपासणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. अजूनही ती संपलेली नाही. तिला उलटतपासणीवेळी विचारलेल्या प्रश्‍नांना तिने हरकत घेतली होती व गुन्ह्यासंदर्भातच प्रश्‍न विचारण्याचे निर्देश संशयिताच्या वकिलांना द्यावेत, अशी विनंती केली होती. ही सुनावणी इन कॅमेरा सुरू आहे. 

पीडित तरुणी कामानिमित्त परदेशात
पीडित तरुणी ही भारताबाहेर कामानिमित्ताने असल्याने ती येऊ शकत नसल्याचे यापूर्वीही सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणातील काही साक्षीदारांच्या जबान्या नोंदविल्या गेल्या होत्या. मात्र उलटतपासणी अजूनही झालेली नाही. या प्रकरणाच्या तपास अधिकारी व उपअधीक्षक सुनिता सावंत खटल्यावरील सुनावणीवर नजर ठेवून आहेत. या प्रकरणातील साक्षीदार हे बहुतेक गोव्याबाहेरील विविध ठिकाणचे असल्याने त्यांना न्यायालयात उपस्थिती लावणे कोविड महामारीमुळे अडचणीचे झाले आहे.

संबंधित बातम्या