Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak

Madgaon Mayor Election : मडगाव पालिकेत विजय किंगमेकर; भाजपचे 5 नगरसेवक फितूर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची शिष्टाई व्यर्थ; मडगाव पालिका कामतांच्या हातातून निसटली

Madgaon Mayor Election : दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसला ‘हात’ दाखवून भाजपत आलेल्या दिगंबर कामत यांना देवाने कौल दिलाच नव्हता की काय? अशी शंका आहे. मडगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कामत यांना जबरदस्त धक्का मिळाला. त्यांनी पुरस्कृत केलेला उमेदवार दामोदर शिरोडकर यांचा अपक्ष घनःश्याम शिरोडकर यांनी 15 विरुद्ध 10 मतांनी पराभव केल्याने मडगाव पालिका कामतांच्या हातातून निसटली.

अपक्ष नगरसेवक घनःश्याम शिरोडकर हे आमदार विजय सरदेसाई यांच्या फातोर्डा फॉरवर्डच्या पाठिंब्यावर नगराध्यक्षपदी निवडून आले. त्यांनी कामत यांचे उजवे हात गणले जाणारे दामोदर शिरोडकर यांचा पराभव केला. दामोदर निवडून यावे यासाठी निवडणुकीच्या आदल्या रात्री ११ वाजेपर्यंत मुख्यमंत्री प्रमोद सावंत मडगाव येथील रेस्ट हाऊसमध्ये भाजप नगरसेवकांची मनधरणी केली होती. ‘ही गोवा फॉरवर्डची मडगाव मतदारसंघातील राजकारणाची सुरवात आहे. आता मडगाव फॉरवर्ड नेण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे,’ अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी दिली.

Vijai Sardesai
Digambar Kamat : दिगंबर कामतांना मडगाव नगराध्यक्ष निवडणुकीत जोरदार धक्का

मुख्यमंत्र्यांची शिष्टाई व्यर्थ

दिगंबर कामत यांनी लावलेला जोर, मुख्यमंत्र्यांची शिष्टाई शेवटी अखेर व्यर्थ गेली. निवडणुकीत पाच भाजप नगरसेवकांनी क्रॉस मतदान केल्याने दामोदर यांचा सपशेल पराभव झाला. ते पराभूत झाले असले तरी पक्षांतर केलेल्या दिगंबर कामतांना हा खरा राजकीय धक्का मानला जात आहे.

नाईक यांची माघार

नगराध्यपदाचे मतदान गुप्त पद्धतीने झाले. या पदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. पण भाजपचे नगरसेवक सदानंद नाईक यांनी श्रेष्ठींच्या सुचनेनुसार मतदानापूर्वी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे घनःश्याम व दामोदर शिरोडकर यांच्यात सरळ लढत होऊन घनःश्याम यांनी बाजी मारली.

‘देवाचा प्रसाद आपणालाच’

नगरसेवकांना सभागृहात जाताना मोबाईल वा अन्य कसलेच कागदपत्रही नेण्यास मज्जाव केला होता. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी नगरपालिकेत येऊन घनःश्याम शिरोडकर यांचे हार घालून अभिनंदन केले. नंतर ते सगळे समर्थक नगरसेवकांसमवेत पिंपळकट्ट्यावर गेले व दामबाबाचे आशीर्वाद घेतले. तेथे बोलताना घनःश्याम यांनी देवाचा आपणालाच प्रसाद झाल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com