विजय सरदेसाई यांनी जिभेला लगाम घालावा- आमदार सोपटे

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

गोवा फॉरवर्ड चे आमदार विजय सरदेसाई यांना मंत्रिमंडळातून काढून टाकल्यापासून ते वैफल्यग्रस्त झालेले असून ते बुध्दीभ्रष्ट झाल्याप्रमाणे वागत आहेत. त्यांनी आपल्या जिभेला लगाम घालावी, अन्यथा विजय सरदेसाई यांच्या  सर्व गैरव्यवहार बाहेर काढू, असा इशारा मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी आज मांद्रे येथील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

पेडणे : गोवा फॉरवर्ड चे आमदार विजय सरदेसाई यांना मंत्रिमंडळातून काढून टाकल्यापासून ते वैफल्यग्रस्त झालेले असून ते बुध्दीभ्रष्ट झाल्याप्रमाणे वागत आहेत. त्यांनी आपल्या जिभेला लगाम घालावी, अन्यथा विजय सरदेसाई यांच्या  सर्व गैरव्यवहार बाहेर काढू, असा इशारा मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी आज मांद्रे येथील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

गोवा  फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात दीपक कळंगुटकर यांनी प्रवेश केल्यानंतर त्या कार्यक्रमात मांद्रेचे भाजप आमदार दयानंद सोपटे हे भाजपला आणि मांद्रे मतदारसंघाला लागलेला एक ‘व्हायरस’ असल्याचे म्हटले होते. त्यासंदर्भात दयानंद सोपटे बोलत होते. या पत्रकार परिषदेला मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष मधू परब, पेडणे मतदारसंघ भाजप मंडळ अध्यक्ष तुळशिदास गावस, गोवा भाजप अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष सिध्देश पेडणेकर, मांद्रे  मतदारसंघ भाजप उपाध्यक्ष गोविंद आजगावकर, अनंत गडेकर आदी उपस्थित होते.

विजय सरदेसाई यांनी नगरनियोजनमंत्री असताना जमीन रुपांतर करण्यासाठी एक चौरस मीटरसाठी तीन हजार रुपये दर लावले व घेतले. विजय सरदेसाई हेच एक लुटारू असल्याचा आरोप दायानंद सोपटे यांनी करत आमदार विजय सरादेसाई यांचे सर्व गैरव्यवहार जर त्यांनी आपल्या तोंडाला लगाम घातला नाही, तर बाहेर काढणार असा इशारा दिला.

मासा जसा पाण्याबाहेर आला की तडफडतो तशी स्थिती आमदार विजय सरदेसाई यांची झाली आहे. आता सत्ता नाही म्हणून नको असलेली विधाने करत असून ते वैफल्यग्रस्त बनले आहेत. विजय सरदेसाई यांनी आपल्याला राजकारण आणि शहाणपणा शिकवू नये. आपण गेली वीस वर्षे राजकारणात आहे. ज्या कोणाला विजय सरदेसाई यांना आपल्या पक्षात प्रवेश द्यायचा असेल, त्यांनी आणखीनही कोणाला जरूर द्यावा, प्रत्येकाला स्वप्ने पाहण्याचा अधिकारी आहे, अशीही टीका त्यांनी केली. 
गोवा  फॉरवर्ड व या पक्षाचा आमदार हा जशी माडाला कीड लागते आणि माड संपतो तशी गोवा राज्याच्या राजकारणाला लागलेली कीड असून या कीडीला गोव्याच्या जनतेने वेळीच ठेचले पाहिजे, नाहीतर विजय सरदेसाई हे गोव्याचे राजकारण मलीन करतील, अशी टीका मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष मधू परब यांनी केली.

यावेळी  पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशिदास गावस म्हणाले, की विजय सरदेसाई यांनी मांद्रेत आणि पेडणे मतदारसंघात आपले उमेदवार निवडून आणणार असे वक्तव्य केले असून त्यांनी पेडणे तालुक्यात गोवा फारवर्डचे आमदार दोन्ही मतदारसंघात पेडणे आणि मांद्रेत आणण्याची स्वप्ने पाहू नयेत. पेडणे आणि मांद्रे मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते आणि मतदार भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी सक्षम आहेत.

संबंधित बातम्या