गोवा: NDA तून का बाहेर पडलो? कारण सांगताना सरदेसाईंचे भाजपवर गंभीर आरोप

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

भाजपशी कोणतेच संबंध न ठेवण्याचा निर्णय  पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेऊन ‘रालोआ’मधून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.

पणजी: भाजप सरकार सोबत सत्तेत नसलेला गोवा फॉरवर्ड पक्ष केंद्रातील राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) घटक असल्याने भाजपविरोधी जनतेला पक्षाच्या भूमिकेबाबत संभ्रम होता. त्यामुळे भाजपशी कोणतेच संबंध न ठेवण्याचा निर्णय आज पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेऊन ‘रालोआ’मधून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केली. आघाडीचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यासंदर्भात पत्रही पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.(Vijay Sardesai's serious allegations against BJP after leaving NDA)

गोव्यात नवी इनिंग सुरु करण्यासाठी 'आप' तयार

गुढी पाडव्याच्या आजच्या पवित्र दिवशी आमच्या पक्षासाठी ही नवीन सुरवात नसून आमचे सहकारी जे गोवा पुढे नेऊ पाहतात त्या सर्वांसाठी ही नवीन राजकीय सुरवात असल्याचे ते म्हणाले. वास्तविक राष्ट्रपतींच्या गोवा मुक्ती हिरक महोत्सवी कार्यक्रमासह सर्व सरकारी कार्यक्रमात सहभागी न होता याआधीच आम्ही या आघाडीतून बाहेर आल्याचे स्पष्ट केले होते. आज ही अधिकृत घोषणा होत आहे. आमचे लागेबांधे गोवेकारांशी आहेत. आम्ही या आघाडीकडे भविष्यात कुठलेही संबंध ठेवणार नाहीत. गोवा फॉरवर्ड पक्ष भाजप सरकारविरोधात टीका करतात मात्र केंद्रातील ‘एनडीए’बरोबर कसे राहू शकतात असा प्रश्‍न काही समाजकार्यकर्त्यांनी उपस्थित केला व आठवडाभरात या पक्षाने बाहेर पडावे असे आव्हान दिले होते. ते आव्हान स्वीकारून आजच्या गुढीपाडव्याच्या शुभदिनीच हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार विनोद पालयेकर, आमदार जयेश साळगावकर व पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर उपस्थित होते. 

आमदार सरदेसाई (Vijay Sardesai) म्हणाले, जुलै २०१९ पासून भाजप गोवेकारांचा घात करत आहे. या भाजप सरकारची धोरणे गोवा (Goa) विरोधात आहेत. ज्यावेळी मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) मुख्यमंत्री होते तेव्हा भाजपची धोरणे गोव्यासाठी पोषक होती मात्र प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे मुख्यमंत्री झाल्यापासून या सरकारची धोरणे बदलली. २०१९ सालीच गोवा फॉरवर्डचे ‘रालोआ’शी संबंध तुटले होते. त्यामुळेच म्हादई, मोले, रेल्वे दुपदरीकरण, बेरोजगारी, कोविड गैरव्यवस्थापन या साऱ्या प्रश्नावर आम्ही विद्यमान सरकारला धारेवर धरले होते. भाजपच्या ‘रालोआ’चा एजंडा विध्वंसक आहे. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हादई विकली व गोवा हे कोळसा ‘हब’ व ‘कॉरिडोर’ करण्याचा या सरकारचा मुख्य लक्ष आहे. या सरकारने राज्यात गांजा लागवड उत्पादनाचा प्रयत्न केला मात्र पक्षाने उठविलेल्या आवाजामुळे त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. त्यामुळे हे भाजप सरकार दिवसेंदिवस अधिक भ्रष्टाचारी होत असल्याचा सडतोड आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

संबंधित बातम्या