मे. सिड्रेला एजन्सीज फसवणूकप्रकरणी विक्रम नायक याची चौकशी सुरू

प्रतिनिधी
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

हेडलॅन्ड-सडा येथील मे. सिड्रेला एजन्सीज फसवणूकप्रकरणी बायणा येथील विक्रम नायक याची मुरगाव पोलिसांकडून चौकशी सुरू झाली असून, मंगळवारी त्याची बरीच झाडाझडती घेतली.

मुरगाव:  हेडलॅन्ड-सडा येथील मे. सिड्रेला एजन्सीज फसवणूकप्रकरणी बायणा येथील विक्रम नायक याची मुरगाव पोलिसांकडून चौकशी सुरू झाली असून, मंगळवारी त्याची बरीच झाडाझडती घेतली.

संशयित विक्रम नायक ही व्यक्ती मे. सिड्रेला एजन्सीजचा भागीदार आहे. त्याच्यासोबत सडा येथील दामोदर दिवकर हे भागीदार आहेत. या दोघांनी मुरगाव बंदरात भागीदार कंपनीद्वारे व्यवसाय सुरू केला होता. पण, विक्रम नायक या भागीदाराने आपली फसवणूक केल्याची तक्रार दामोदर दिवकर यांनी जानेवारीपासून मुरगाव पोलिसांकडून केली आहे. पण, या तक्रारीची पोलिस दखल घेत नसल्याने पोलिस प्रमुखांच्या कानी हा प्रकार घातल्यावर मुरगाव पोलिसांनी तपास करण्यास प्रारंभ केला. त्यानुसार मंगळवारी विक्रम नायक याला मुरगाव पोलिसांनी पोलिस स्थानकावर बोलावून घेऊन एकूण प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी तक्रारदार दामोदर दिवकर हेही उपस्थित होते.

संशयित विक्रम नायक याने आपली व्यवसायात फसवणूक केली आहे. आपला जगण्याचा हक्कही त्याने हिरावून घेतला आहे अशा आशयाची तक्रार दामोदर दिवकर यांनी मुरगाव पोलिसांकडे केली होती. पण, पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते. श्री. दिवकर यांनी या प्रकरणी माघार न घेता नव्याने तक्रार केल्यावर मुरगाव पोलिसांनी पुन्हा तपासाची चक्रे हालविली आहे.

विक्रम नायक वास्कोत पत्रकार म्हणूनही कार्यरत आहे. त्यामुळेच मुरगाव पोलिस तक्रारीकडे दुर्लक्ष करीत होते. पण, दामोदर दिवकर यांनी चोकशीसाठी हट्ट धरल्याने अखेर मंगळवारी विक्रम नायकची मुरगाव पोलिसांनी सुमारे दोन तास चौकशी केली.

वास्कोतील जुगार अड्डे मालकांकडूनही विक्रम नायक हप्ता घेत असल्याचे श्री. दिवकर यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्या विषयीचा ऑडिओ व्हायरल झाल्याचेही पुराव्यानिशी श्री. दिवकर यांनी मुरगाव पोलिसांना सांगितले.

मुरगाव पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साजीद पिल्ले यांनी विक्रम नायक ह्याची चौकशी केली. यावेळी श्री. दिवकर यांच्या वयस्कर आईनेही विक्रम नायक याने आपल्या घरात असलेल्या मे. सिड्रेला एजन्सीजच्या कार्यालयात घूसून कशाप्रकारे विविध दस्तावेज चोरून नेले याचीही माहिती पोलिसांना दिली.

मुरगाव पोलिसांनी विक्रम नायक आणि दामोदर दिवकर या दोघा भागीदारांचे म्हणणे नोंद करुन घेतले आहेत. या फसवणूक प्रकरणात मे. काणकोणा हायड्रोकार्बन या कंपनीचेही नाव तक्रारदार श्री. दिवकर यांनी नमूद केल्याने त्यांनाही अधिक चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या