पंचायतीची पूर्व परवानगी न घेता एमएस मोव्हाज एन्टरप्राईझिसचा प्रवेश द्वाराजवळ वादग्रस्त सूचना फलक

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

पंचायतीची कोणतीच पूर्व परवानगी न घेता प्रवेश द्वाराजवळ मोठा सूचना फलक लावल्याने हा बेकायदेशीररित्या पंचायत खपवून घेणार नसल्याचे केळशीच्या सरपंच मरिया सौझा यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हटले आहे.

कुठ्ठाळी : कुठ्ठाळी केळशी येथील वादग्रस्त एमएस मोव्हाज एन्टरप्राईझिसचा इंडिया पार्क प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने स्थानिक केळशी पंचायतीची कोणतीच पूर्व परवानगी न घेता प्रवेश द्वाराजवळ मोठा सूचना फलक लावल्याने हा बेकायदेशीररित्या पंचायत खपवून घेणार नसल्याचे केळशीच्या सरपंच मरिया सौझा यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हटले आहे.

या सूचना फलकामध्ये उल्लेख केलेल्या दाखल्यांचा किंवा परवानगीच प्रकरण उच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट असल्याने तो न्यायालयाचा अवमान होतो. या विषयावरून नुकत्याच पार पडलेल्या ऑक्टोबरच्या पंचायत मंडळाच्या बैठकीमध्ये सर्वानुमते ठराव संमत करून तो त्वरीत हटवण्याची ताकीद मोव्हाज एन्टरप्राईझिस लिमिटेडला देण्याचे पंचायतीने ठरवले आहे.
यानुसार पंचायत सचिव नारायण आजगांवकर यांना संबंधिताना नोटिस जारी करण्याचे सांगितले असता ते तसे करायला तयार नाहीत. मोव्हाज एन्टरप्राईझिस लिमिटेडला नोटिस जारी करण्याचे बैठकीत ठरलेले आहे. 
याबाबत रीतसर नोंदवहीत नोंद ही करण्यात आली असल्याचे सरपंच सौझा म्हणतात. पंचायत सचिव नारायण आजगावकर मिनी इंडिया पार्क प्रकल्पाच्या बाजूने का वावरतात ते  मात्र कळायला मार्ग नाही.

सचिव आजगावकर यांच्या या संशयास्पद कार्यपध्दतीवर पंचायत संचालकांनी कठोर कारवाई करावी अशा प्रकारचा ठराव पंचायतीने घेतला असून लगेच तक्रार करण्यात येईल. याशिवाय पंचायत सचिव नारायण आजगांवकर यांची येथून ताबडतोब बदली करावी अशी मागणी पंचायत मंडळाने केली आहे. या त्यांच्या वृत्तीमुळे पंचायतीचे कामकाज व्यवस्थितपणे चालत नसून त्याचा फटका येथील ग्रामस्थांना होत आहे.

संबंधित बातम्या