ग्रामस्थांना अंधारात ठेऊन लोकवस्तीच उभारणार होते कचऱ्याचे शेड

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

लोकवस्तीच्या मध्यभागी शेड बांधण्याऐवजी इतरत्र ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही व कुणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाण निश्चित करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

सांगे: ग्रामस्थांना अंधारात ठेऊन सांगे तालुक्यातील भाटी ग्रामपंचायतीने वॉर्ड क्रमांक चारमधील कोंगारे बाराजण तिस्क येथे सुका कचरा व्यवस्थापनासाठी शेड बांधण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून लोकवस्तीच्या मध्यभागी शेड बांधण्याऐवजी इतरत्र ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही व कुणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाण निश्चित करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

भाटी ग्रामपंचायतीने गावकऱ्यांचा विरोध होत असल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांना लेखी पत्र पाठवून बोलविले होते. यावेळी सुमारे १२० ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन सरपंच उदय नाईक यांना गावकऱ्यांनी सादर केले. मटेरिअल रिकव्हरी सुविधा शेड नियोजित जागेत न बांदता इतर चार पाच सरकारी जागा सुचविण्यात आल्या असून तेथे बांधण्यात यावी अशी मागणी केली आहे. सध्या पंचायतीने काँगारे - बाराजन तिस्क येथील जलसोत्र खात्याने पंचायतीला दिलेल्या ६०० चौरस मीटर जागेत सुका कचऱ्यासाठी सुविधा निर्माण करण्याचे ग्रामपंचायतीचे प्रयोजन आहे. मात्र, ही जागा भर लोकवस्तीत असून चोहोबाजूंनी घरे आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी यापूर्वी सरपंचांना भेटून विरोध दर्शविला होता. त्यानंतर पंचायतीने ग्रामस्थांना पत्र पाठवून बोलाविले. 

यावेळी सरपंच उदय नाईक यांनी ग्रामस्थांना सांगितले, की या प्रकल्पात ग्रामस्थांचा विरोध असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी असा वरचेवर विरोध होत असेल तर त्याला अर्थ नसून लोकांचे म्हणणे स्पष्टपणे जाणून घ्या असे सांगितल्याने पत्र पाठवून बैठक आयोजित केल्याचे स्पष्ट केले. यावेळी सुका कचरा व्यवस्थापनसाठी बावीस लाख रुपये निधी आला असून वेळेत हा प्रकल्प हाती न घेतल्यास निधी परत जाईल यासाठी पंचायतीकडून ही घाही चालू असल्याचे दिसून आले. यावेळी ग्रामस्थांनी सरपंचांना चार ते पाच सरकारी जमिनीचे सर्वे क्रमांक दिले असून त्याजागेचा विचार करावा, अशी मागणी केली आहे. तसेच ज्या उद्देशासाठी जलसोत्र खात्याकडून ही जमीन संपादीत केली होती, त्याकरता उपयोगात आणण्यास काहीच हरकत नसल्याचे म्हटले आहे.

तसेच गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असून येथे पाण्याची टाकी किंवा बगिचा उभारावा, असे सुचविले. पंचायत मंडळाने ग्रामस्थांना अंधारात ठेऊन डिसेंबर २०१९ रोजी हा ठराव संमत केला होता. पंच मनोज पर्येकर हे सूचक, तर उपसपंच व स्थानिक पंच आवडू गावकर यांनी ठरावाला अनुमोदन दिले होते, अशी माहिती पुढे आली आहे. यावर ग्रामस्थांचे म्हणणे आपण गटविकास अधिकाऱ्यांना कळवितो तसेच गावच्या पाचजणांच्या शिष्टमंडळाची बैठक  उपजिल्हाधिकाऱ्यांबरोबर घेतो, असे सरपंच श्री. नाईक यांनी सांगितले.

संबंधित बातम्या