कदंब पठारावरील बांधकामांविषयी कायद्याचे उल्लंघन

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

 कदंबा पठारावर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या निवासी मेगा प्रकल्पाविरूद्ध तक्रार करूनही आझोशी-मंडूर ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 पणजी : कदंबा पठारावर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या निवासी मेगा प्रकल्पाविरूद्ध तक्रार करूनही आझोशी-मंडूर ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पंचायतक्षेत्राच्या हद्दीतील भूसर्वेक्षण क्रमांक ८ मध्ये एका निवासी प्रकल्पाचे काम सुरू असून, त्याअंतर्गत सुमारे एक लाख चौरस मीटर जागेत १४०  भूखंड विकसीत करण्याचे काम केले जात आहे. यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रियांचे उल्लंघन झाल्याचे माहिती हक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीअंती ही बाब पुढे आली आहे.  

या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांमध्ये पुढे नेले जात आहे. पहिल्या टप्प्यांत १८ हजार चौरस मीटर जागेत ३८ भूखंड व दुसऱ्या टप्प्यांतर्गत ९२ हजार चौ. मी. जागेत १०८ विकसीत करण्यात येत 
आहेत. यासाठी ग्रामपंचायतीकडून तात्पुरते ना हरकत दाखले घेतले आहेत, पण ग्रामपंचायत किंवा नगरनियोजन खात्याकडून अंतिम ना हरकत दाखले न घेताच प्रचंड मोठे कुंपण तसेच प्रवेशद्वाराचे बांधकाम झाल्याचे येथे स्पष्ट दिसत 
आहे.

माहिती अधिकारांतर्गत मिळविलेल्या विविध कागदपत्रांनुसार स्थानिक ग्रामपंचायतीने पहिल्या टप्प्यातील कामासाठी परवानगी मागितली त्याच दिवशीच कोणतीही पाहणी न करता काही तासांतच तात्पुरता ना हरकत दाखला दिला आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामाविषयीसुद्धा अशीच घाई झालेली आहे. 

विशेष म्हणजे हे दोन्ही दाखले कोणतेही शुल्क न घेता दिले आहेत. त्यामुळे पंचायत लाखो रुपयांच्या महसूलास मुकली असल्याने ग्रामपंचायतीच्या या भूमिकेवर सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून, या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

 
सामाजिक कार्यकर्ते आणि शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या या व्यक्तीने याविषयीची माहिती अधिकाराकडे सरकारकडे माहिती मागितली होती. 
कदंब पठारावरील डोंगराळ भागात असलेल्या या जागेतील काही भाग राष्ट्रीय हरीत लवादाच्या एका आदेशान्वये निर्धारीत खासगी वनक्षेत्रात येत असल्यामुळे याठिकाणी बांधकाम करण्यासाठी आवश्यक वन खात्याची परवानगीदेखील घेतली नसल्याचे उघड झाले आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे याठिकाणी भूखंड विकसीत करण्यासाठी या जागेतील उताराची जागा कचरा, चिखल व गाळ टाकून बुजविल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांतर्फे ग्रामपंचायतीस निवेदन देऊन पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यासह या कामांची संयुक्त पाहणीची विनंती केली होती. पण दीड महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही पंचायतीने या निवेदनाची दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या