'पिलियन रायडर्स' बनताहेत वाटाड्या; गोव्याच्या वाहतूक पोलिसांची वाढलीये डोकेदुखी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 मार्च 2021

बहुतांश जणांच्या मागे त्यांच्या पत्नी किवा प्रेयसी बसलेल्या असतात. त्या गुगलवर मार्ग पाहून रस्ता दाखवत असतात. मात्र त्यामुळे त्या ‘नो इंट्री’तून जातात यांचे त्यांना भान नसते.

पणजी: गोव्यात येणारे पर्यटक विशेषतः रविवारी व सुट्टीच्या दिवशी पणजी शहरात वाहतूक नियमांचा भंग करून वाहने चालवताना दिसतात. सुट्टीच्या दिवशी पणजी शहरात इतर वाहने कमी असतात व वाहतूक पोलिसही सुट्टीवर असतात. क्वचितच काही जागी पोलिस असतात.

मात्र शहरातील बहुतांश भागात दररोज असतात तसे पोलिस नसल्याचा फायदा घेऊन पर्यटक ‘नो इंट्री’तून वाहने पळवितात. आणि त्यामुळे लहान मोठे अपघात घडतात. सुट्टीच्या दिवशी ‘रेंट अ बाईक’वरुन फिरणारे पर्यटक  वाहतूक नियम तोडण्यात नेहमीच पुढे असतात. पणजी चर्चजवळून पुढे कोर्तींम येथे जाण्यासाठी ‘वन वे’ आहे. मात्र या ‘वन वे’ रस्त्याने अनेक रेंट अ बाईक सुट्टीच्या दिवशी ‘नो इंट्री’च्या फलकाकडे दुर्लक्ष करुन येतात. जुन्या पाटो पुलावरुन, जुझे फालको रस्त्यावरुन हे ‘रेंट अ बाईक’वरून सरळ पुढे येतात.

बहुतांश जणांच्या मागे त्यांच्या पत्नी किवा प्रेयसी बसलेल्या असतात. त्या गुगलवर मार्ग पाहून रस्ता दाखवत असतात. मात्र त्यामुळे त्या ‘नो इंट्री’तून जातात यांचे त्यांना भान नसते. पणजी शहरातील बहुतांश रस्ते ‘वन वे’ केले गेले आहेत. मात्र हे ‘रेंट अ बाईक’ चालक मिळेल त्या रस्त्याने ये जा करतात. आणि त्यामुळे नियमानुसार वाहन चालवणाऱ्यांना प्रसंगावधान राखून वाहन चालवावे लागते. दिवसाला दीड हजार ते दोन हजार रुपये भाडे देऊन हे पर्यटक ‘रेंट अ बाईक’ घेतात.  

पणजीत काही ठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, त्यामध्ये नियम तोडताना या दुचाकी सापडल्या तर त्यांच्या मालकांना दंडाची नोटीस पाठवली जाते. ‘रेंट अ बाईक’ भाड्यावर घेणाऱ्या पर्यटकांना हे माहीत असते. दंड भरावा लागलाच तर तो ‘रेंट अ बाईक’च्या मालकाला  आपणास नाही! असे म्हणून हे पर्यटक मनमानीपणे दुचाकी सुसाट चालवतात. मात्र त्यामुळे नियमानुसार वाहने चालविणाऱ्यांची  त्रेधातिरपीट उडते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही पणजीत मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिस तैनात ठेऊन वाहतूक नियम तोडणाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

जनता कर्फ्यूला एक वर्ष; नियमांकडे दुर्लक्ष, कोरोनाचा पुन्हा उद्रेक 

संबंधित बातम्या