आरोग्य खात्याच्या संचालकांना खासगी रुग्णालयात उपचार; नेटकऱ्यांची टीका

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

आरोग्य खात्याचे संचालक कोरोनाच्‍या संसर्गामुळे गुरुवारी खासगी रुग्णालयात उपाचार घेत असल्याची बातमी व्‍हायरल झाल्‍याने सरकारी इस्‍पितळांवर भरवसा नाही का? असा प्रश्‍‍न उपस्‍थित करीत आरोग्य खात्यावर समाजमाध्यमांतून टीकेच झोड उठली आहे.

पणजी: राज्यात कोरोनाच्या रुग्णांची दिवसेंदिवस भर पडत आहे. सर्वसामान्‍यांसह मंत्री, आमदार, नगसेवक, पोलिस, सरकारी कर्मचारीही या महामारीतून सुटलेले नाहीत. कोविड इस्‍पितळात सर्वसामान्‍यांना मिळणाऱ्या सुविधा आणि तेथे होणारी आबाळ याबाबत सोशल मीडियावर नाराजी व्‍यक्त होत आहे. तर दुसरीकडे व्‍हीआयपी रुग्णांना खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा पाहता आरोग्य खात्‍यावर टीका होत आहे. त्‍यानंतर आरोग्य खात्याचे संचालक कोरोनाच्‍या संसर्गामुळे गुरुवारी खासगी रुग्णालयात उपाचार घेत असल्याची बातमी व्‍हायरल झाल्‍याने सरकारी इस्‍पितळांवर भरवसा नाही का? असा प्रश्‍‍न उपस्‍थित करीत आरोग्य खात्यावर समाजमाध्यमांतून टीकेच झोड उठली आहे.

आरोग्य खात्याचे संचालक डॉ. ज्योस डिसा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्‍यामुळे त्‍यांना खासगी रुग्णालयात दाखल केल्याची वार्ता समजली आणि विरोधी पक्षातील नेत्यांसह नेटकऱ्यांनी आरोग्य खात्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. एका बाजूला सामान्य रुग्णांना मडगाव आणि इतर कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्याशिवाय या रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांबाबत जाहीर वाच्यता होत नसली, तरी यापूर्वी खात्यावर टीका झालेली आहे. कोरोनाच्या काळात ज्यापद्धतीने आरोग्य खात्याची एकंदर स्थिती आहे, ती पाहता सर्व काही आलबेल आहे, असे दिसते. 

आता जनतेला देवच वाचवेल : कामत
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ट्विट करीत संचालकांना खासगी रुग्‍णालयात दाखल करावे लागल्‍याच्‍या प्रकरणावरून राज्‍य सरकारच्‍या कोरोनाविरुद्धच्‍या प्राथमिक लढ्याचा पर्दाफाश केल्‍याचे म्‍हटले आहे. या महामारीतून आता जनतेला देवच वाचवेल, असा पुनरुच्चार त्‍यांनी पुन्‍हा एकदा केला आहे.

 

 

कोरोनाबाधितांना एकसमान उपचार द्यावेत : खंवटे
आमदार रोहन खंवटे यांनी सरकार टीका केली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्‍या सर्व रुग्णांना एकसमान उपचार मिळणे आवश्‍यक आहे. पण, राज्य सरकारने अधिकाऱ्यांना वेगळे आणि सामान्यांना वेगळे उपचारपद्धती अवलंबली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाबत ज्या सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, त्याविषयी त्यावर विश्‍वास ठेवता येणार नाहीत. शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत यांनी डॉ. डिसा यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून, ते आजारातून बरे व्हावेत, अशी प्रार्थना करीत आहोत. परंतु संचालकांना व्हीआयपी सुविधा दिली गेली आहे.

यापूर्वीही आमदार आणि मंत्र्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे. त्यातून सामान्य जनतेसाठी असलेल्या रुग्णालयात खासगी रुग्णालयाप्रमाणे सुविधा नाहीत, हे दाखवून दिले आहे. त्याचबरोबर यावरून राज्यात व्हीआयपी कल्चर असल्याचे दिसून येते. लोकांनी याबाबत नाराजी व्‍यक्त केली आहे.

...तर सर्वसामान्‍यांचे काय?
नेटकऱ्यांनीही राज्य सरकारला व्हीआयपी सुविधा दिल्या जात असल्यावरून धारेवर धरले आहे. सामान्य जनतेचे आरोग्य सांभाळण्यासाठी कार्यरत असणाऱ्या आरोग्य खात्याकडे त्यांच्या अधिकाऱ्यांवर उपचार करणाऱ्या सुविधा नाहीत, हेच संचालकांना खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर दिसत आहे, असेही काहींनी मते मांडली आहेत. याचबरोबर अनेकांनी याविषयी मुख्यमंत्र्यांबरोबर आरोग्य मंत्र्यांवरही शाब्दिक मारा केला आहे.

उपचारात भेदभाव का?
कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे खासगी रुग्णालयात केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, आमदार चर्चिल आलेमाव, माजी मंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांच्यासह काही शासकीय अधिकाऱ्यांवर उपचार होत आहेत. या व्हीआयपी उपचारांमुळेच सर्वसामान्यांना उपचारासाठी करण्यात आलेल्या सुविधांवर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सर्वसामान्‍यांना मडगाव कोविड इस्‍पितळात, ईएसआय इस्‍पितळात, फोंड्यातील कोविड केंद्रात, चिखली येथील इस्‍पितळात दाखल केले जाते. तर राजकीय नेतेमंडळींना खासगी इस्‍पितळात दाखल करण्‍यात येत आहे. कोविडसंदर्भात सर्वांना उपचार समान असावेत, अशी मागणी लोकांकडून जोर धरू लागली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या