'आधी कर्नाटक सरकारला आमचं म्हादईचं पाणी देण्यास सांगा'

निवडणूक लढवण्यावरुन कन्नड महासंघाला वीरेश बोरकरांनी सुनावलं
'आधी कर्नाटक सरकारला आमचं म्हादईचं पाणी देण्यास सांगा'
Viresh Borkar Revolutionary GoansDainik Gomantak

पणजी : गोवा कन्नड महासंघाने आगामी पंचायत निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. येत्‍या पंचायत निवडणुकीत गोवा कन्नड समाज स्वतःचे उमेदवार उतरविणार आहे. तशी घोषणा गोव्यातील कन्नड नेत्यांनी केल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादाला खुद्द पंचायतमंत्री माविन गुदिन्हो ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, त्या दाबोळी मतदारसंघातून सुरूवात झाली आहे. कन्नड महासंघाने निवडणुकीसाठी दंड थोपटल्याने आता गोव्यातील स्थानिक राजकीय पक्षांकडून नवीन वाद निर्माण केला जाऊ लागला आहे.

रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनीही कन्नड महासंघावर निशाणा साधला आहे. जर कन्नड महासंघ स्वत:ला गोमंतकीय मानतो, तर म्हादईच्या रक्षणासाठी आजपर्यंत का पुढे आला नाही, असा सवाल बोरकर यांनी उपस्थित केला आहे. कन्नड महासंघ गोव्यासाठी आजपर्यंत पुढे का आला नाही? जर त्यांना खरंच आपण गोमंतकीय आहोत असं वाटत असेल तर त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून म्हादईचं पाणी गोव्याला मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असं खुलं आव्हान बोरकर यांनी दिलं आहे.

Viresh Borkar Revolutionary Goans
गोव्यातील ऐतिहासिक वास्तू येणार CCTV च्या कक्षेत: पुरातत्व संचालनालय

‘‘कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातून अनेक कुटुंबे गेली 50 वर्षांपासून गोव्यात वास्तव्य करून आहेत. ते येथील सर्व विकास प्रक्रियेचा भाग आहेत. त्यांनी राजकारणात उतरायला हरकत काय आहे. कदाचित त्यांची मातृभाषा वेगळी असेल. मात्र, ते सर्व निकषांनी गोमंतकीय आहेत. त्यामुळेच कन्नड महासंघ आता प्रत्यक्ष पंचायत निवडणुकीत भाग घेत आहे’’, असा निर्धार गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिद्धाण्णा मेती यांनी व्यक्त केला होता.

Viresh Borkar Revolutionary Goans
फोंड्यात खोदलेल्या चेंबरमधील पाण्यात बुडून कामगाराचा मृत्यू

राज्यात होऊ घातलेल्या 186 पंचायतीच्या निवडणुकीत कन्नड महासंघ आपले उमेदवार आणि पॅनेल उभे करील, अशी घोषणा गोवा कन्नड महासंघाने केली आहे. कन्नड महासंघाच्या या घोषणेमुळे गोमंतकीयांना नवा विरोधक तयार झाला असल्याचे स्पष्ट आहे. प्रामुख्याने वास्को, मुरगाव, बार्देश, डिचोली, फोंडा या तालुक्यांच्या पंचायत प्रभागात उमेदवार उभे केले जाणार आहेत, असे कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिद्धाण्णा मेती यांनी जाहीर केले.

जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्यात पंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यासाठी गावपातळीवरचे विविध पक्षांचे कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली. प्रभागांची स्थिती, आपल्या बाजूने होणारे मतदान याची जुळवाजुळव सुरू झाली आहे. या निवडणुका राजकीय पक्षाच्या तिकीटावर लढल्या जाणार नसल्या तरी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते निवडून येतील यासाठी नेतेमंडळीही कामाला लागली आहेत. अशातच आता कन्नड महासंघाने गावच्या राजकारणात उडी घेतल्याने पंचायत निवडणुकांत आता बिगर गोमंतकीयांबाबत चर्चा रंगली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.