फोंडा नगराध्यक्षपदी विश्‍वनाथ दळवी बिनविरोध

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

केवळ औपचारिकता तेवढी बाकी आहे. विश्‍वनाथ दळवी यांच्या निवडीमुळे पालिकेवर भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. नगराध्यक्षपदी निवड निश्‍चित झालेल्या विश्‍वनाथ दळवी यांचे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी पालिकेत येऊन अभिनंदन केले.

फोंडा: फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी (गुरुवारी) नगरसेवक विश्‍वनाथ दळवी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे. वास्तविक नगराध्यक्षपदाची निवड (शुक्रवारी २८ रोजी) सकाळी ११ वाजता ठेवण्यात आली असली तरी नगराध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने विश्‍वनाथ दळवी यांची निवड झाल्यात जमा आहे. 

केवळ औपचारिकता तेवढी बाकी आहे. विश्‍वनाथ दळवी यांच्या निवडीमुळे पालिकेवर भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. नगराध्यक्षपदी निवड निश्‍चित झालेल्या विश्‍वनाथ दळवी यांचे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी पालिकेत येऊन अभिनंदन केले. विशेष म्हणजे विश्‍वनाथ दळवी यांचे नाव हल्लीच कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले नगरसेवक रितेश रवी नाईक यांनी सुचवले. फोंडा पालिकेचे माजी नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. फोंडा पालिकेची निवडणूक झाल्यानंतर सुरवातीला मगो पक्षाचे समर्थक नगरसेवक प्रदीप नाईक, त्यानंतर मगोच्या काही नगरसेवकांचे समर्थन मिळून भाजपचे समर्थक नगरसेवक व्यंकटेश नाईक आणि आता पुन्हा एकदा भाजपचे विश्‍वनाथ दळवी अशा तिघाजणांची आतापर्यंत वर्णी लागली आहे.

दरम्यान, विश्‍वनाथ दळवी हे फोंडा पालिकेचे उपनगराध्यक्ष होते, त्यामुळे उपनगराध्यक्षपद रिक्त झाल्याने आता नव्याने या पदासाठी निवडणूक होणार आहे. उपनगराध्यक्षपदासाठी मगो पक्षाचे समर्थक विरेंद्र ढवळीकर किंवा पूर्वीचे कॉंग्रेस व आता भाजपचे आनंद नाईक यांची निवड करण्यात येईल, असे समजते. पालिका मुख्याधिकारी केदार नाईक यांच्या अनुपस्थितीत उमेदवारी अर्ज फोंडा पालिकेचे अधिकारी उदय देसाई यांनी  स्वीकारला.

रितेश नाईक यांनी सूचवले नाव!
कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले नगरसेवक रितेश नाईक यांनीच नगराध्यक्षपदासाठी विश्‍वनाथ दळवी यांचे नाव सूचवले. रितेश नाईक यांची वर्णी उशिरा लागणार आहे. दरम्यान, मंत्री गोविंद गावडे यांनी रितेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर उठवलेल्या वावड्या फोल असल्याचे सांगून रितेश व रॉय नाईक यांचा भाजप प्रवेश म्हणजे नगराध्यक्षपदाची ऑफर असल्याची अफवा पसरली होती, मात्र ती फोल ठरली असून निस्वार्थपणे रितेश यांनी विश्‍वनाथ यांचे नाव सूचवले. त्यामुळे रितेश यांचा भाजप प्रवेश हा कोणत्याही आमिषाला बळी न पडता झालेला आहे, हे सिद्ध होत असल्याचे गोविंद गावडे म्हणाले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या