सापांच्या जीवदानासाठी धडपडणारे ‘विठ्ठल’

vithal shelke
vithal shelke

दशरथ मोरजकर

पर्ये : ‘कोविड-१९’ टाळेबंदीच्या काळात प्रत्येकजण एकमेकांच्या घरी जाण्याचे टाळत असताना पर्यावरणप्रेमी सर्पमित्र विठ्ठल शेळके यांनी या जोखमीच्‍या काळात अनेक विषारी - बिनविषारी सापांना संरक्षण देण्याची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. टाळेबंदीच्या काळात विठ्ठल शेळके यांनी लोकांच्‍या विनंतीनुसार घटनास्‍थळी त्‍वरित पोहोचून १७ नाग, ४ घोणस हे विषारी गटातील, तसेच अजगर, दिवड (धामण), नानेटी, दुतोंड्या, हरयाळी, कवड्या साप, असे अनेक बिनविषारी साप पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले आहे.

साप दिसला, तर मागचा पुढचा विचार न करता त्याला मारण्याची मानसिकता सर्वसामान्य जनतेत पसरलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर विठ्ठल शेळके या युवा सर्पमित्र कार्यकर्त्याने घरात आलेल्या सापांना यशस्वीपणे पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत आहे. त्यामुळे कुणाच्या घरात विषारी अथवा बिनविषारी साप आल्यावर अशा कार्यकर्त्यांना संपर्क साधून बोलावण्‍याचे काम लोक करीत असतात. यातून पर्यावरणाच्या महत्त्वपूर्ण घटकाचे रक्षण होत आहे.

किंग कोब्रासह, प्राण्‍यांनाही जीवदान

पेशाने शिक्षक असलेले विठ्ठल शेळके हे केरी सत्तरीतील विवेकानंद पर्यावरण जागृती फौज यांचे सक्रिय सदस्य आहेत. गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरण शिक्षण, जागृती आणि संरक्षणसाठी ते कार्यरत आहे. त्यांनी पर्यावरण आणि सामाजिक विषयावर आधारित गोवाभर पथनाट्ये सादर केलेली आहेत. ज्‍येष्ठ पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांच्या सहवासात राहून पर्यावरण रक्षणाची बीजे रुजली गेली आणि त्यातूनच त्यांनी साप हाताळण्याची कला अवगत केली. आज ते सत्तरीत सर्पमित्र म्हणून चांगले परिचित आहेत. त्यांनी अजूनपर्यंत जहाल विषारी असणाऱ्या किंग कोब्रासहित अनेक विषारी आणि बिनविषारी सापांना जीवनदान दिले आहे. त्याचबरोबर रानटी जनावरे, कटांदर, घोरपड, मगर, घुबड, सूर्यपक्षी, घार, इत्‍यादी प्राण्यांना जीवदान दिले आहे.

केरी - सत्तरी परिसरात कुणाच्याही घरी साप आला की, विठ्ठल शेकळे यांना बोलावले जाते. त्यावेळी ते साप पकडण्याची काठी व एक कापडी पिशवी घेऊन लगबगीने त्या ठिकाणी दाखल होतात आणि सुरक्षितरित्‍या सापांना पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करतात. टाळेबंदीच्या काळात त्यांनी पकडलेले साप केरी, मोर्ले, शिरोली, घोटेली आदी परिसरातील लोकांच्या घरी आलेले होते.

- महेश तांडेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com