बार्देश बझारासाठी यंदा प्रथमत:च मतदान

 BAZAR
BAZAR


म्हापसा

मरड, म्हापसा येथील बार्देश बझार ग्राहक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका आतापर्यंत नियमितपणे झालेल्या असल्या तरी यंदा प्रथमच या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, असे सध्याच्या एकंदर राजकीय हालचालींवरून स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत यंदा रमाकांत खलप पॅनेल आणि जयवंत नाईक पॅनेल असे दोन प्रमुख गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
संस्थेची स्थापना २१ ऑगस्ट १९८९ रोजी झाल्यानंतर गेल्या सुमारे तीस वर्षांच्या कालावधीत सर्वच्या सर्व संचालक मंडळांची निवड बिनविरोध झालेली आहे. आतापर्यंत या संस्थेवर रमाकांत खलप यांची निर्विवादपणे अधिसत्ता होती. त्यांच्याच नेतृत्वाखालील पॅनेल प्रत्येक वेळी बिनविरोध निवडून आले आहे. प्रारंभीच्या टप्प्यात या संस्थेच्या अध्यक्षपदी रमाकांत खलप दीर्घ काळ होते; पण, त्यानंतर त्यांनी पुरस्कृत केलेले उमेदवारच अध्यक्षपदी राहिलेले आहेत. अलीकडच्या काळात वासुदेव धाकुली शिरोडकर, चंद्रशेखर दिवकर, जयवंत नाईक, धर्मा चोडणकर यांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषवले आहे, तर सध्या गुरुदास सावळ हे अध्यक्षपदी आहेत.
यंदा आपण स्वत: संस्थेच्या निवडणुकीसाठी उभे राहणार नाही, असे रमाकांत खलप यांनी अन्य संचालकांसमोर बोलताना स्पष्ट केले आहे. असे असले तरी ते तसेच त्यांची पत्नी निर्मला व पुत्र आश्‍विन हे तिघेही अंतिम क्षणी निवडणूक अर्ज दाखल करू शकतात. विद्यमान संचालक मंडळातील बहुतांश सदस्य या निवडणुकीत अर्ज दाखल करतील, असे वाटते.
खलप पॅनेलचा पराभव करून जयवंत नाईक व धर्मा चोडणकर यांनी संस्थेचे अध्यक्षपद अर्ध्या अर्ध्या कार्यकाळासाठी भूषवावे, असा विरोधी गटाचे समर्थक असलेल्या संस्थेच्या काही सभासदांचे म्हणणे आहे. परंतु, त्याबाबत धर्मा चोडणकर यांनी तळ्यात मळ्यात भूमिकेचा अवलंब न करता ठामपणे कोणत्या तरी एकाच गटाची बाजू घ्यावी, असे त्या गटाचे म्हणणे आहे.
संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळात गुरुदास सावळ, जयवंत नाईक, रवींद्र फोगेरी, रमाकांत खलप, महादेव नाटेकर, एकनाथ नागवेकर, रघुवीर देसाई, गोकुळास शिरोडकर, धर्मा चोडणकर, रामकृष्ण मोरजकर, नारायण राठवड, निर्मला रमाकांत खलप, चंद्रकांत शेटगावकर व विश्‍वास नाईक यांचा समावेश आहे.
सध्या निवडणूक अर्ज स्विकारणे सुरू झाले असून, २५ जूनपर्यंत सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत त्यासंदर्भात निर्धारित मुदत आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी २५ जून रोजी सायंकाळी ५ वाजता घोषित होईल व उमेदवारी अर्जांची छाननी २६ रोजी सकाळी १०.३० ते ३० रोजी दुपारी ४ पर्यंत होणार आहे. ३० रोजी सायंकाळी ५ वाजता ग्राह्य उमेदवारी अर्जांची यादी जाहीर केल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी १ जुलै व २ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत अशी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी ३ रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल. 

GOA GOA GOA

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com